HEADLINE

Breaking News

सुधागड बौद्धजन पंचायतीचे पाली तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन




सुधागड बौद्धजन पंचायतीचे पाली तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन


सुधागड (जि. रायगड) / निवास सोनावळे :- कोकण रेल्वे मार्गावरील कोलाडजवळील तिसे गावाच्या रेल्वे गेट येथे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या चंद्रकांत कांबळे या कर्मचाऱ्याची भरदिवसा गोळी घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून या धक्कादायक घटनेचे पडसाद संबंध रायगडसह महाराष्ट्रभर उमटत असून आंबेडकरी जनतेकडून या हत्येच्या चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत सुधागड तालुका बौद्धजन पंचायत (र. नं. २७५६) च्या वतीने सुधागडचे तहसीलदार उत्तम कुंभार व पाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांना गुरुवारी (दि. २४) कांबळे यांच्या हत्येच्या चौकशीसाठी निवेदन देण्यात आले आहे.

सदरच्या घटनेतील मृत पावलेले कर्मचारी चंद्रकांत कांबळे हे कोकण रेल्वे मार्गावरील रोहा तालुक्यातील कोलाडजवळील तिसे गावाच्या रेल्वे फाटकावर सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. चंद्रकांत कांबळे आपले कर्तव्य बजावत असताना सोमवारी ( ता.२१ ) दुपारच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्याने त्यांची गोळी झाडून निर्घृण हत्या करून घटनास्थळावरून फरार झाला आहे. कांबळे यांच्या हत्येची बातमी कळताच रायगड जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील, पक्षाचे तसेच इतरही पक्ष संघटनांचे नेते पदाधिकारी तसेच कार्यकर्ते त्या ठिकाणी दाखल झाले. कांबळे यांच्या मारेकऱ्याचा शोध घेऊन त्याला तत्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी सुधागड तालुका बौद्धजन पंचायतीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदन देताना सुधागड तालुका बौद्धजन पंचायत मध्यवर्ती कमिटीचे अध्यक्ष भगवान शिंदे, जेष्ठ पदाधिकारी प्रभाकर गायकवाड, पाली नगरपंचायतीचे नगरसेवक सुधीर भालेराव, महिलाध्यक्षा नूतन शिंदे, रोहिणी शिंदे, संजीवनी जाधव, निशांत पवार, नितीन जाधव, आदेश कांबळे, संतोष जाधव, सतीश गायकवाड, भीम महाडिक, कविता पडवळ, सविता वाणी, किरण कांबळे, राजेश जाधव, संजय वाघमारे, नितीन पडवळ, विजय वाघमारे आदी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत