HEADLINE

Breaking News

मॅकमोहन हुले यांनी हिमाचल प्रदेशातील अवघड व उंच माऊंट हनुमान तिब्बा शिखर केले सर; रायगड जिल्ह्यातील एकमेव गिर्यारोहक



पाली - अमित गवळे: मॅकविला द जंगल यार्डचे संस्थापक व सुधागड तालुक्याचे सुपुत्र प्रसिद्ध गिर्यारोहक मॅकमोहन हुले यांनी हिमाचल प्रदेशातील धौलाधार आणि पीर पांजल रांगेच्या मध्यवर्ती असलेले आणि या भागातील सर्वात उंच आणि अत्यंत अवघड समजले जाणारे माऊंट हनुमान तिब्बा हे 5982 मीटर (19626 फुट) उंचीचे शिखर नुकतेच यशस्वीरीत्या सर केले. जगातील काही मोजकीच लोकं या शिखराच्या माथ्यावर पोहचली आहेत आणि त्यात यादीत आता मॅकमोहन यांचे नाव आले आहे. विशेष म्हणजे हे अवघड शिखर सर करणारे मॅकमोहन हुले रायगड जिल्ह्यातील एकमेव व पहिले गिर्यारोहक आहेत.
    अपघात मुक्त गिर्यारोहण क्षेत्र व भविष्यात महाराष्ट्रात पर्वतारोहण संस्थेची स्थापना करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट होते. हिमाचल प्रदेशात आलेल्या पुरामुळे सगळीकडे गोंधळाची परिस्थिती होती. वीज गायब झाली होती. मोबाईल इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद होती. पाणी, इंधन, फळं आणि भाजीपाला नव्हता. सुरक्षेच्या कारणास्तव काही दिवस बुरूवा गावातच थांबावे लागले आणि शनिवारी (ता.15) सुखरूपपणे टीम मुंबई इथे पोहोचली.
    महाराष्ट्रातील गिरीमित्र प्रतिष्ठान संस्थेच्या मंगेश कोयंडे, मॅकमोहन हुले, अमोल आळवेकर व अरविंद नवेले या चार क्लाइंबिंग सदस्यांनी आणि विशाल ठाकूर, गोपाळ ठाकूर व भागचंद ठाकूर या गाईड अश्या एकूण 7 जणांनी सहभाग घेतला होता. मॅकमोहन हुले हे या मोहिमेचे उपप्रमुख (डेप्युटी इन्चार्ज) होते.  मॅकमोहन हुले हे व्यावसायिक गिर्यारोहक व आयएमएफचे रूट सेटर आहेत. त्यांनी बेसिक आणि इतर बरेच प्रशिक्षण पूर्ण केले आहेत. त्यांनी सह्याद्रीतील अनेक सुळके कातळभिंती सर केल्या आहेत. शिवाय 'मॅकविला द जंगल यार्ड'चे संस्थापक आहेत. या मोहिमेसाठी हुले यांना नांदगाव हायस्कुलचे शिक्षक अशोक शिंदे सर यांनी पाच हजार,दिनेश कदम दोन हजार रुपयांची व गावातिल इतर सदस्य आणी मित्रपरीवार कडुन शुल्क मदत मिळाली.

   मोहिमेतील अवघड समाजाला जाणारा टेंटू पास,समिट कॅम्प,हनुमान तिब्बाचा शिखरमाथा मॅकमोहन व टीम ने लीलया पार केला. मोठ्या प्रमाणात पाऊस, बर्फवृष्टी, साधारण 100 किमी प्रतितासच्या गतीने वाहणारे हिमवारे, अंधुक प्रकाश, पाण्याची आणि ऑक्सिजनची कमतरता असे निसर्गाचे अवघड टप्पे पार करून त्यांनी ही मोहीम पूर्ण केली.
 
   "हे शिखर पार करणारा जिल्ह्यातील पहिला एकमेव गिर्यारोहक झाल्याने खूप अभिमान वाटत आहे. नवोदितांना या क्षेत्रात येण्यासाठी व प्रोत्साहन मिळण्यासाठी महाराष्ट्रात पर्वतारोहण संस्थेची स्थापना होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अशा प्रकारच्या मोहिमांसाठी व प्रशिक्षण घेण्यासाठी गिर्यारोहक व पर्वतारोहकांना शासन, स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींमार्फत आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे."
---
मॅकमोहन हुले, गिर्यारोहक व प्रस्तरारोहक


अशी केली चढाई यशस्वी

२ जुलै २०२३ रोजी सकाळी ६.३० वाजता टेंटू पास बेस कॅम्प ते कॅम्प १ अश्या टेंटू पास मार्गे ट्रेकला सुरुवात केली आणि तब्बल १२ तासांनी संध्याकाळी सगळी टीम सुरक्षितरित्या कॅम्प १ ला पोहचली.रात्री सर्वांनी कॅम्प १ येथे मुक्काम केला.

३ जुलै २०२३ रोजी सकाळी ८.३० वाजता सगळी टीम समिट कॅम्पच्या दिशेने मार्गस्थ झाली आणि तब्बल पावणे आठ तासाने संध्याकाळी ४.१५ वाजता टीम समिट कॅम्प येथे पोहचली आणि रात्री सर्वांनी समिट कॅम्प येथे मुक्काम केला.

४ जुलै २०२३ रोजी आम्ही समिट प्रयत्न करणार होतो पण दिवस आणि रात्रभर पडलेल्या पावसामुळे आम्ही आमचे नियोजन बदलले आणि समिट कॅम्प येथे टेन्ट मध्येच मुक्काम केला.

५ जुलै २०२३ रोजी रात्री १ वाजता आम्ही सगळे तयार होऊन रात्रीच्या अंधारात हेडलॅम्पच्या आधारावर शिखराच्या दिशेने मार्गस्थ झालो आणि सकाळी ९ वाजता शिखर माथ्यावर पोहोचलो, आणि सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन अँकरिंग सुरू असताना लगेच सोसाट्याच्या वारा, हिमवर्षाव आणि अंदुक प्रकाश झाला. मग लगेच १-२ फोटो आणि व्हिडिओ काढले आणि लगेच ९.१५ वाजता खाली उतरण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आणि सगळी टीम लगबगीने खाली उतरायला सुरुवात झाली. सर्व पॅच सावधरित्या रॅपेलिंग आणि ट्रेक करून  सगळी टीम साधारण ३-४ तासांत १२.१५ ते १.१५ दरम्यान समिट कॅम्प येथे पोहचली. रात्रभरचा ट्रेक आणि हेवी स्नो फॉल त्यामुळे दमलेल्या टीमने टेन्ट मध्ये आराम केला आणि समिट कॅम्प येथे टेन्ट मध्येच मुक्काम केला आणि बाहेर रात्रभर स्नो फॉल सुरूच होता.

६ जुलै २०२३ रोजी थोडं वातावरण साफ होते आणि आदल्या दिवशी शिखर माथ्यावर नीट फोटो आणि व्हिडिओ घेऊ न शकल्यामुळे सगळ्यांनी समिट कॅम्प येथे लवकर सकाळी सगळे नियोजित फोटो आणि व्हिडिओ घेतले. सकाळी ११ वाजता पूर्ण टीम समिट कॅम्प वाईंड - अप वरून कॅम्प १ च्या दिशेने मार्गस्थ झाली आणि तब्बल सहा तासांनी संध्याकाळी पाच वाजता सगळी टीम कॅम्प १ ला पोहचली आणि तिथे मुक्काम केला. रात्रभर हेवी स्नो फॉल सुरूच होता.

७ जुलै २०२३ रोजी सकाळ पासूनच हेवी स्नो फॉल आणि पाऊस सुरूच होता आणि पाऊस थोडा थांबल्यावर सकाळी ११ वाजता पूर्ण टीम कॅम्प १ पासून टेंटू पास मार्गे टेंटू पास बेस कॅम्प येथे ट्रेकला सुरुवात केली सर्व पॅच सावधरित्या रॅपेलिंग करून आणि साधारण रात्री ८ वाजता पूर्ण टीम सुरक्षितरित्या टेंटू पास बेस कॅम्प येथे पोहचली आणि तिकडे टेन्ट मध्ये मुक्काम केला रात्रभर पाऊस सुरूच होता.

८ जुलै २०२३ रोजी सकाळ पासूनच पाऊस सुरूच होता मग सकाळी निघण्याचा  निर्णय घेण्यात आला आणि १०.३० वाजता सगळी टीम बियास कुंड - भोजपथर - 
बकरर्थाच मार्गे संध्याकाळी ४ वाजता धुंदीला हायवे येथे पोहचली. आम्ही ओढे - नाले जाताना क्रॉस केले होते ते सगळे सततच्या पावसामुळे दुथडी भरून वाहत होते. वाटेत एक ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप बियास कुंड ट्रेक करिता आला होता पण जोरदार पाऊस बघून भयभीत झाला होता मग त्यांना थोडी मदत करून त्यांना सुरक्षितरित्या सगळे ओढे - नाले पार करून त्यांना खाली आणले. आमची पूर्ण टीम खाली आल्यावर आम्ही आमच्या बुरुवा गावाच्या दिशेने गाडीने मार्गस्थ झालो आणि मागे वळून पाहताना मोहीम यशस्वीरीत्या आणि सुरक्षितरित्या पूर्ण झाल्याचे समाधान मनात होते.

गिरीमित्र प्रतिष्ठान संस्थेच्या या माऊंट हनुमान टिब्बा शिखर चढाई मोहिमेमध्ये खालील संस्थेतील सदस्यांनी खूप मेहनत घेतली त्यामुळे ही मोहीम यशस्वी झाली या सर्वांचे आभार - गिरीमित्र प्रतिष्ठान,ॲडवेंचर इंडिया, माउंटन स्पोर्टस् अँकॅडमी, शिखर पर, जिद्दी माऊंटेनेरिंग, मॅकविला दी जंगलयार्ड, मनाली येथे भोला ठाकूर आणि मुंबई येथे बबन कुडतरकर यांनी संपर्कप्रमुखाचे काम योग्यरीत्या बजावले त्यामुळे सगळ्या सदस्यांच्या कुटुंबीयांना वेळोवेळी योग्य मोहिमेची माहिती भेटतं होती.

तसेच काही गिरीमित्रांनी आम्हाला योग्य आणि मोलाचे  मार्गदर्शन केले त्यामुळे या शिखराची अचूक माहिती भेटली त्यामुळे ही मोहीम यशस्वी झाली या सर्वांचे आभार - एव्हरेस्टर रफिक शेख, एव्हरेस्टर शरद कुलकर्णी सर, एव्हरेस्टर कृष्णा ढोकळे सर, नंदू चव्हाण सर, राजेश गाडगीळ सर, कैवल्य वर्मा.


माऊंट हनुमान तिब्बा शिखर सर करतांना मॅकमोहन हुले. 

माऊंट हनुमान तिब्बा शिखरावर तिरंगा फडकवतांना मॅकमोहन हुले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत