माथेरानच्या डोंगरावर दरड कोसळली? मोठा आवाज झाल्याने धोदाणीचे ग्रामस्थ भयभीत
मुसळधार पाऊस कोसळत असल्याने माथेरानच्या मंकी पॉईंट च्या खालील माती दोन दिवसांपासून खाली कोसळत आहे.
नवीन पनवेल : माथेरानच्या डोंगरावर दरड कोसळली असल्याची घटना 25 जुलै रोजी घडली असल्याची माहिती धोदाणी येथील ग्रामस्थांनी दिली. याची माहिती तात्काळ प्रशासनाला दिल्यानंतर प्रशासन या ठिकाणी हजर झाले व सावधानता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुसळधार पाऊस कोसळत असल्याने माथेरानच्या मंकी पॉईंटच्या खालील माती दोन दिवसांपासून खाली कोसळत आहे. त्यामुळे गाढी नदीतील पाणी लाल झाले आहे. 25 जुलै रोजी सकाळपासून माथेरानच्या डोंगरावर मोठा आवाज होत असल्याने येथील ग्रामस्थ घाबरले. दरड कोसळण्याच्या आवाजाने येथील नागरिक सतर्क झाले. त्यानी याची माहिती प्रशासनाना दिली. रात्रीच्या वेळी तत्काळ प्रांत अधिकारी राहुल मुंडके, तहसीलदार विजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, बीडीओ संजय भोये, मंडळ अधिकारी, मनसेचे आपत्कालीन पथकाचे योगेश चिले, विश्वास पाटील घटनास्थळी हजर झाले. त्यांनी आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली. रात्रीची वेळ असल्याने नक्की काय प्रकार झाला आहे हे पाहता आले नाही. मात्र प्रशासन तात्काळ हजर झाल्याने त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी इर्षाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेमुळे नागरिक आणि प्रशासन सतर्क झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागरिक स्वतःची काळजी घेत आहेत तसेच प्रशासन वारंवार सूचना देत आहेत.


जनतेची जत्रा
उत्तर द्याहटवा