HEADLINE

Breaking News

अनर्थ टळला, पाली येथे गुरांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; स्थानिकांनी राखले प्रसंगावधान.



| सुधागड-पाली | | अमित गायकवाड | 

१८ ऑगस्ट २०२३

पाली: पाली येथे गुरे चोरी करण्याची घटना नुकताच घडली. मात्र स्थानिकांच्या प्रयत्नाने तात्काळ आरोपींना पाली पोलिसांच्या मदतीने पकडण्यात यश आले. सदर घटना, गुरुवार दि. १७ ऑगस्ट रोजी रात्रौ १०.००  वाजताचे सुमारास भेरव ते उन्हेरे दरम्यान घडली. निखील शाह व त्याचे मित्र ओंकार  खोडागळे, अमित जाधव, सुरज  गुप्ता हे उन्हेरे कुंडावर अंघोळ करण्याकरीता गेले असता रात्री १०.३० वाजण्याचे सुमारास अंघोळीनंतर आपआपल्या घरी जाण्याकरीता निघाले असता मौजे उन्हेरे येथील मोरीजवळ पाली कडून उध्दर कड़े जाणा-या रस्त्यावर त्यांना एक सफेद रंगाची महेंद्रा पिकअप क्र.एम.एच.१४ एच.जी.०५२६ ही संशयास्पदरित्या जात असताना दिसली म्हणून तिला थांबविण्यासाठी त्या पिकअपच्या मागे पाठलाग करत गेले. पिकअपला लावलेली ताडपत्री उडाल्याने त्यामध्ये गुरे कोंबलेली त्यांना दिसली. त्यामुळे त्यांनी त्या पिकअपचा पाठलाग केला. परंतू तो पिकअप थांबला नसल्याने सदरची गुरे चोरून नेत असल्याचा संशय त्यांना आला. सदर पिकअपचा पाठलाग केला असता पिकअप चालकाने भैरव, पो.खुरावले, ता. सुधागड येथील रस्ता संपत असलेल्या ठिकाणी पिकअप थांबविला. त्यावेळी पिकमधील चालक व त्याचे सोबत असणारे इसम गाडीमधून उडया मारून पळत जात असताना दिसले म्हणून त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले.

पिकअपच्या मागील बाजूस त्या सर्वांनी जावून पाहिले असता चार गुरे कोंबलेल्या अवस्थेत दिसली. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या सहकार्याने  पकडण्यात आले. यामध्ये टेम्पोचालक याच्यासह तिन इसम पिकअप व त्यातील जनावरे पोलीसांच्या ताब्यात दिली. सदर आरोपी रोहा येथील राहणारे आहेत व सदर गुरे कत्तली करिता खोपोली येथे न्हेत असावेत असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. घटनेनंतर स्थानिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पाली पोलीस स्थानका अंतर्गत अधिकचा तपास करण्यात येत आहे. आरोपींवर भारतीय दंड संहिता १८६० कलम ३७९, ३४ व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, १९६० कलम 11(1) (g),11(1) (d) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम, १९९५ कलम 9 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत