HEADLINE

Breaking News

ऐन गणेशोत्सवात, गणेशभक्तांच्या खिशाला बसतेय चाट! महागाईत फुलांचा सुगंध आणि फळांचा गोडवा हरपला!




| परळी /सुधागड प्रतिनिधी |

राहुल गायकवाड 
गणेशोत्सवामध्ये फुले आणि फळांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या वाढत्या मागणीमुळे सध्या फळांचे आणि फुलांचे दर आकाशाला भिडल्याने गणेशभक्तांच्या खिशाला चाट बसत आहे. मोकळ्या फुलांचे दर जरी शंभर ते चारशे रुपये किलो दरम्यान असले तरी तयार हारांची किंमत मात्र फुलांच्या कित्येक पट अधिक आहे.

गणेशोत्सवामध्ये बाप्पाच्या पुजेसाठी दररोज मोठ्या प्रमाणात फुले आणि फळे लागतात. मोगरा आणि गुलाबाच्या फुलांचा सुगंध तर अधिकच महागला आहे. झेंडूने तर यंदा दरात चांगली बाजी मारली आहे. जादा फुलांची मागणी व्यापाऱ्यांकडे अगोदरच करावी लागत आहे. नाहीतर जादा दराने फुले विकत घेण्याची वेळ येत आहे. त्यामध्ये अधिक भर बेभरवशाच्या पावसामुळे पडली आहे. त्यामुळे बाजारात फुलांची आवक कमी होऊ लागली आहे. निशिगंधाची फुले पूर्वी 50 ते 60 रुपये किलो होती. आता 180 रुपयांच्या पुढे गेली आहे. झेंडूने देखील भाव खाल्ला आहे. 80 ते 120 रुपये किलोच्या दराने विकला जात आहेत. झेंडू बाजारात मोठ्या प्रमणात उपलब्ध होत असला तरी देखील त्याची किंमत वाढली आहे.

गुलाबाच्या एका फुलाचा दर पूर्वी 10 रुपये होता. आता तेच एक फूल 15-20 रुपयांना मिळत आहे. ग्रीन हाऊसमधील डच गुलाबाला चांगली मागणी आहे. तसेच कलकत्ता झेंडू आणि पिवळा झेंडूचा दर कमी जास्त आहेे. मोगऱ्याच्या फुलांचा दर सध्या तिपटीने वाढला आहे. पूर्वी 250 रुपये किलो असायचा आता तोच दर 700 ते 800 रुपये झाला आहे. त्यामुळे मोगऱ्याचा दरवळ महागात पडत आहे. हारांच्या वाढलेल्या किंमतीमुळे काही नागरिक फुले आणून घरातच हार बनवित आहेत.
फळांचे भाव वधारले
फळांचे भाव देखील वधारले आहेत. सध्या बाजारात कच्ची केळी 40 रुपये तर पिकलेली केळी 50 ते 60 रुपये डझन प्रमाणे मिळत आहे. सफरचंद 100 ते 140 रुपये किलो, मोसंबी डाळिंब, चिकू 70 ते 90 रुपये किलो, तर सिताफळ 90 ते 140 रुपये किलो दराने मिळत होते. या फळांबरोबरच इतर फळांचे भाव देखील वाढल्याचे दिसून येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत