HEADLINE

Breaking News

कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कुपोषित बालकांची हेळसांड




|कर्जत ||वार्ताहर|

कर्जत तालुक्यातील कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी करून अतितीव्र कुपोषित असलेल्या बालकांना कर्जत उपजिल्हा रुग्णालय मधील पोषण आणि पुनर्वसन केंद्रात दाखल केले जाणार होते. मात्र सकाळी आलेली बालके यांची तपासणी करायला डॉकटर उपलब्ध नसल्याने तीन वाजेपर्यंत ही सर्व बालके रुग्णालयात कोणत्याही नाश्ता जेवण यांच्याविना थांबून होती.

दरम्यान, त्या 19 बालकांना तपासणीसाठी आणणार्‍या युनायटेड वे या संस्थेकडून मागणी केल्यावर कशेले ग्रामीण रुग्णालयातून वैद्यकीय अधिकारी आल्यानंतर बालकांची तपासणी करण्यात आली. कर्जत तालुक्यातील खांडस आणि कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रातील 19 कुपोषित बालके यांना आरोग्य तपासणी साठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. ही सर्व बालके दोन रुग्णवाहिका मधून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात अकरा वाजता आणण्यात आली.

त्यातील बहुसंख्य कुपोषित बालके ही आपल्या घरातून सकाळी लवकर निघाली आहेत. मात्र कर्जत येथे आल्यावर उपजिल्हा रुग्णालयात मोठा धक्का त्या बालकांना घेवून येणार्‍या युनायटेड वे या संस्थच्या कार्यकर्त्यांना बसला. डॉ मस्कर हे पनवेल येथे जात असल्याने दूर दूर वरून किमान 30किलोमिटर वरून आलेल्या कुपोषित बालकांची तपासणी करायला वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करून जाणे आवश्यक बाब होती.

शेवटी तीन वाजता कर्जत तालुक्यातील कशेले ग्रामीण रुग्णालय येथील डॉ प्रतिक झेंडे हे बाळरोग तज्ञ कुपोषित बालकांची तपासणी करण्यासाठी कर्जत येथे पोहचले. त्यानंतर कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी सुरू झाली, मात्र तोपर्यंत या सर्व 19बालकांना कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कोणत्याही प्रकारचा आहार दिला गेला नव्हता. तपासणी साठी आणण्यात आलेल्या बालकांना चहा बिस्किटे यांचा आहार देण्याची आवश्यकता असताना कोणत्याही प्रकारचा आहार उपजिल्हा रुग्णालय येथे देण्यात आला नव्हता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत