HEADLINE

Breaking News

खोपोलीतील प्रकाश नगर येथे लुंबिनी बुद्ध विहारात वर्षावास कार्यक्रम संपन्न.


| खालापूर | | वार्ताहर |

खोपोली (दि. १५ ऑक्टो.) : वर्षावास ही बुद्धकाळापासून चालत आलेली परंपरा आहे. वर्षा म्हणजे पाऊस, वास म्हणजे निवास. म्हणजेच पावसाळ्याच्या तीन महिने भिक्खूंना पावसापासून त्रास होऊ नये, त्यांना विषारी प्राण्यांपासून इजा होऊ नये म्हणून त्यांनी स्थानिक बुद्धविहारात अथवा स्तूपात राहून तेथील उपासक उपासिकांना धम्माचा उपदेश करावा, अशी परंपरा आहे. आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या काळात प्रत्येक बुद्धविहारात वर्षावास साजरा करण्यात येतो. भगवान बुद्धांनी समस्त मानवाला अविद्येच्या अज्ञान अंधकारातून मुक्त करणारे आणि प्रज्ञेच्या प्रकाशामध्ये आणणारे ज्ञान पेरले. याच दिवसापासून बुद्ध धम्मातील पवित्र तीन महिन्यांच्या वर्षावासाला सुरवात होते.
    
    खोपोली - प्रकाश नगर येथील लुंबिनी बुद्ध विहार येथे दि. 03/07/2023 ते दि. 28/10/2023 या कालावधीत वर्पषावास संपन्न होत आहे. या वर्षावास मालिकेचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा खोपोली अंतर्गत वार्ड शाखा प्रकाश नगर यांनी केले आहे. या वर्षावास मालिकेत विविध विषयावरील प्रवचनाचा लाभ येथील उपासक व उपासिकांना झाला. दि. 15/10/2023 रोजी या मालिकेचे  20 वे पुष्प गुंफित ''बुद्ध धम्म आणि मानवता'' या विषयावर आद. केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य आयु.संतोषजी जाधव सर यांनी उपस्थितीना संबोधित केले.

    बुद्धाने जगाला एक अंत्यत महान अशी गोष्ट दिली आहे ती म्हणजे धम्म. मनुष्याची मनोधारणा बदलल्याशिवाय जगाची सुधारणा किंवा उन्नती होऊ शकणार नाही, असे बुद्धांचे सांगणे आहे. बौद्ध धर्म हा मानवतेवर आधारीत आहे. या धम्मात दैववाद नाही, कर्मकांड नाही.  बुद्धाचा धम्म हा मानवतावादी आहे. या धर्माशिवाय मानवाच्या कल्याणा साठी दुसरा कोणताही उपयुक्त धर्म नाही म्हणून जगाला बुद्ध धर्माशिवाय पर्याय नाही. बुद्धाने केवळ जाती व्यवस्थे विरुद्ध हत्यार उपसले नाही तर त्यांनी आपल्या संघात शुद्रातिशुद्राना सन्मानाने जागा दिली. सागरामध्ये मिळाल्यावर जसे नदीचे पाणी ओळखणे अशक्य असते त्याच प्रमाणे बुद्ध धम्मात आल्या नंतर जाती नष्ट होऊन सर्व समान होतात. असे उपस्थितांना मार्गदर्शन करताना  आदरणीय प्रवचनकार संतोष जाधव या वेळी सांगत होते.

    जगावर युद्धाचे सावट असताना आज संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश देत बुद्ध आणि त्यांचा धम्म जगासमोर आदर्शाची उंची कायम ठेऊन आहे.  बुद्धाचा धम्म मानवतेला प्रत्येकाच्या मनात जिवंत ठेवतो.  बुद्धानंतर सम्राट अशोक, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांनी आपणास माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे तसेच  प्रत्येक माणसाला समानतेची शिकवण दिली आणि सर्व सामान्यांना समान हक्क मिळावे यासाठी संघर्ष केला व जगाला मानवतावादी संदेश दिला. 

    या कार्यक्रमासाठी लुंबिनी बुद्ध विहार प्रकाश नगर येथे कार्यक्रमाचे दान दाते आयु. हरी दगडू निकाळजे आपल्या परिवारासह उपस्थित होते. तसेच भारतीय बौद्ध महासभा वार्ड शाखा प्रकाश नगर कमिटी, उपासक, उपासिका, बालवर्ग, आम्रपाली महिला मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत