भोप्याचीवाडी आदिवासीवाडी मधील घर कोसळले अडीच वर्षाचा चिमुरडा थोडक्यात बचावला
अमित गवळे
पाली, ता. 21 (वार्ताहर) जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसात सुधागड तालुक्यातील भोप्याचीवाडी आदिवासीवाडी मधील एका घराच्या स्वयंपाक घराची भिंत व छत शनिवारी (ता. 20) दुपारी कोसळले. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेला अडीच वर्षाचा चिमुरडा थोडक्यात बचावला.
मात्र चुलीतील आगीमुळे त्याचा हात भाजला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की वारा व पावसामुळे येथे राहणारे हिरामण पवार यांच्या घराच्या स्वयंपाक घराची भिंत व छत अचानक कोसळली. यावेळी स्वयंपाक घरामध्ये अनुष पवार (वय. अडीच वर्षे) हा भिजलेला असल्याने तेथे चुलीजवळ शेकत बसला होता. तर घरामध्ये दुसऱ्या खोलीत एक वयोवृद्ध महिला व आणखी एक महिला आणि चार लहान मुले होती. स्वयंपाक खोलीचे कौलारू व लाकडी छत आणि भिंत अचानक खाली कोसळली. यावेळी अनुश येथून पटकन दुसऱ्या खोलीमध्ये पळाला मात्र या झटापटीमध्ये चुलीच्या निखारा त्याच्या हाताला लागल्याने त्याचा हात भाजला. या संदर्भात अजून शासनाकडे कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. तसेच पंचनामा देखील झालेला नाही. असे राहिवाशी अविनाश पवार यांनी सांगितले. मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनील यांनी शासनाकडे नुकसानीचे त्वरित पंचनामा करण्याची व नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
फोटो ओळ, पाली, भोप्याचीवाडी आदिवासीवाडी मधील कोसळलेले घर. (छायाचित्र, अमित गवळे)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत