HEADLINE

Breaking News

द दारूचा नव्हे दुधाचा नवीन वर्षाचे स्वागत करूया दूध पिऊन अंनिस विविध संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार




अमित गवळे 

    

पाली, ता. 30 (वार्ताहर) सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरला सेलीब्रेशनच्या नावाखाली खास करून तरुण पिढी मध्ये मोठ्या प्रमाणात व्यसन वाढताना दिसत आहे. त्यामुळे थर्टी फर्स्ट ला प्रबोधन करण्यासाठी व व्यसनापासून अनेकांना खास करून तरुणांना दूर ठेवण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच विविध सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्ते थर्टी फर्स्ट ला ठिकठिकाणी दुधाचे वाटप करणार आहेत. 

    अनेक तरुण-तरुणी ३१ डिसेंबरला व्यसनाचा पहिला अनुभव घेतात आणि पुढे जावून व्यसनाच्या आहारी जातात. या पार्श्वभूमीवर 28 डिसेंबर ते 3 जानेवारी या कालावधी मध्ये महाराष्ट्र अंनिस मार्फत चला व्यसन बदनाम करूया या मोहिमे अंतर्गत ‘दारू नको दुध प्या!’ हा उपक्रम राज्यभर  राबवला जाणार आहे अशी माहिती डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, फारुख गवंडी, मिलिंद देशमुख, विनोद वायंगणकर, मुक्ता दाभोलकर, प्रकाश घादगिने, राजीव देशपांडे, नंदिनी जाधव, रामभाऊ डोंगरे, सम्राट हटकर, मुंजाजी कांबळे,अशोक कदमआणि संदेश गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये ठीक ठिकाणी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.  पाली, पेण, अलिबाग व पनवेल आदी अंनिस शाखांमध्ये हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात असे महा. अंनिस रायगड जिल्हा पेण शाखेचे पदाधिकारी संदेश गायकवाड यांनी सांगितले. 

    गेल्या पंधरा वर्षा पासून महाराष्ट्र अंनिस 31 डिसेंबर च्या आठवड्यात चला व्यसन बदनाम करूया हि मोहीम राबवते. सध्या समाजात  व्यसनाचे उद्दात्तीकरण  होताना  दिसते आहे. यामुळे तरुण मुले व्यसनाच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. असे असताना महाराष्ट्र शासन मात्र महसूल वाढवण्यासाठी समाजात व्यसन वाढवण्याला प्रोत्साहन देताना दिसते. मद्य विक्री वाढवून शासनाचा महुसूल वाढवण्याचे शासनाने नुकतेच सुतोवाच केले आहे.एका बाजूला लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे आणि भावाला मात्र व्यसनाच्या तोंडी द्यायचे असे हे धोरण आहे त्यामुळे याला अंनिसचा विरोध आहे. त्यामुळेच व्यसनाची प्रतिष्ठा तोडण्याबरोबरच शासनाने समग्र व्यसन विरोधी नीती जाहीर करावी यासाठी देखील या साप्ताह दरम्यान पाठपुरावा केला जाणार आहे. 

    ३१ डिसेंबरला लोकांनी दारू प्यावी म्हणून दारू दुकाने उशिरा पर्यंत चालू ठेवण्याची परवानगी शासन देते हे व्यसनाला बढावा देणारे धोरण शासनाने थांबवावे म्हणून मा. जिल्हाधिकारी आणि तहसीलदार  यांना ठिकठिकाणी निवेदन देण्यात येणार असल्याचे देखील पत्रकात नमूद केलेले आहे. 


चौकट 1

आयुष्य व्यसनमुक्ती केंद्रातर्फे संकल्प व्यसनमुक्तीचा महायज्ञ दुधाचा


   आयुष्य व्यसनमुक्ती केंद्र अध्यक्ष तथा पाली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष अंकुश आपटे यांच्या संकल्पनेतून 31 डिसेंबर रोजी पालीमध्ये 200 लिटर दूधाचे वाटप करण्यात येणार आहे. 

    मंगळवारी (ता.31) सायंकाळी 4 ते सायंकाळी 7:00 वाजेपर्यंत मोफत दूध वाटपाचा उपक्रम पालीतील छत्रपती संभाजी महाराज चौक मधली आळी येथे केला जाणार आहे.  जेणेकरून नववर्षाचे स्वागत मद्यपानाने न करता दूध पिण्याच्या संकल्पनेतून करून एक उत्तम उदाहरण समाजाच्या पुढे ठेवले जाणार आहे.

    

चौकट 2

व्यसन विरोधी युवा निर्धार मेळावा 

   महाराष्ट्र अंनिस या सप्ताह अंतर्गत राज्यभरात व्यसन विरोधी युवा निर्धार मेळाव्यांचे  आयोजन करण्यात आले आहे. व्यसनमुक्त व्यक्ती हस्ते दारूच्या बाटलीला जोडे मारून मेळाव्याचे उदघाटन केले जाणार आहे.  या मेळाव्यामध्ये तरुणांना व्यसनमुक्ती दूत म्हणून काम करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. व्यसनमुक्ती दूताचे प्रशिक्षण घेतलेले युवक युवती पुढील आठवड्यामध्ये समाजात व्यसनच्या  विरोधी पोस्टर प्रदर्शन, व्यसन विरोधी  फिल्म शाळा कॉलेजमध्ये  दाखवणे, गावामध्ये व्यसन विरोधी फेरीचे आयोजन करणे ,शाळा कॉलेजमध्ये व्यसानाविषयी भाषण देणे ,दारूच्या बाटलीला जोडे मारा आंदोलन,व्यसनविरोधी  प्रतिज्ञा असलेल्या फ़्लेक्स वर नागरिकांच्या सह्या घेणे, व्यसनमुक्त व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय यांचा स्नेहमेळावे तसेच सोशल मिडियामध्ये व्यसन विरोधी संदेश प्रसारित करणे असे कार्यक्रम ठीकठिकाणी करणार आहेत. अशी देखील माहिती देण्यात आली.



फोटो ओळ, पाली, मागील वर्षी महा. अंनिस पेण शाखेतर्फे व्यसनाला बदनाम करूया सप्ताह कार्यक्रमात प्रबोधन व दुधाचे वाटप करताना कार्यकर्ते. (संग्रहित छायाचित्र )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत