HEADLINE

Breaking News

परभणीतील घटनांच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेचा महाराष्ट्र बंद; "हे सरकार म्हणजे नव्या पेशवाईचा उदय" - अमित गायकवाड



खालापूर/ब्यूरो : परभणी जिल्ह्यातील संविधान अपमान प्रकरण आणि सोमनाथ सुर्यवंशी या युवकाचा संशयास्पद मृत्यूचा निषेध करत रिपब्लिकन सेनेने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष अमित गायकवाड यांनी सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधत म्हटले की, "महाराष्ट्रात दलितांवर अन्याय आणि अत्याचारात लक्षणीय वाढ झाली आहे. हे सरकार म्हणजे नव्या पेशवाईचा उदय आहे.  १० डिसेंबर २०२४ रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली. ही घटना अत्यंत निंदनीय असून, अशा समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी खालापूर तहसील कार्यालय व खालापूर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन केली आहे.

         या घटनेच्या निषेधार्थ ११ डिसेंबर रोजी संविधानप्रेमी जनतेने परभणीत आंदोलन केले. मात्र, पोलिसांनी या आंदोलनावर अमानुष लाठीचार्ज केला आणि शेकडो आंदोलकांना अटक केली. या कारवाईत सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. गायकवाड यांनी हा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "ही हत्या आहे की पोलिसांच्या अमानुष मारहाणीत झालेला मृत्यू, याचा तपास होणे गरजेचे आहे," असेही ते म्हणाले. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन आणि जबाबदार पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे. या अमानवीय घटनेचा राज्यभरात तीव्र निषेध व्यक्त होत असून, या विरोधात रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी १६ डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. "दलितांवर अन्याय आणि संविधानाचा अपमान रोखण्यासाठी आता उग्र आंदोलनाशिवाय पर्याय नाही," असे अमित गायकवाड यांनी ठणकावून सांगितले. तसेच, जनतेने या बंदमध्ये सहकार्य करून संविधानाच्या सन्मानासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी रिपब्लिकन सेनेचे उ.रायगड जिल्हाध्यक्ष अमित गायकवाड, उ.रायगड जिल्हा महासचिव वैभव केदारी बहुजन क्रांती पँथर संघटनेचे रोशन मोरे, ऑल इंडिया पँथर सेनेचे माजी रायगड जिल्हा अध्यक्ष नरेश गायकवाड, विशाल वाघमारे, सचिन कांबळे, अविनाश वाघमारे, सुधीर कडवे, समीर गायकवाड, सुरज गायकवाड, प्रतीक लोखंडे, निशांत पानपाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


परभणीतील घटनांच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेचा महाराष्ट्र बंद; "हे सरकार म्हणजे नव्या पेशवाईचा उदय" 

- अमित गायकवाड

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत