पाली: भेरव वाघोशी पुलावरून एसटी चालकाने पूराच्या पाण्यातून बस चालवल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात आला असून या पुलावरील वाहतूक थांबवण्याची मागणी केली जात आहे.रायगड: राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे.रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात सलग तीन-चार दिवस मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे अनेक गावांना जोडणाऱ्या पुलावरून पाणी जात आहे. पाली खोपोली राज्य महामार्गाला पर्याय असलेल्या भेरव वाघोशी पुलावरून देखील पाणी जातना दिसत आहे. मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस, मोटारसायकल स्वार धोका पत्करून याच पुलावरून वाहतूक करीत आहेत.
एसटी चालकाने तर चक्क प्रवाशांच्या जीविताशीच खेळ केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. पुलावरून पाणी जात असताना एसटी चालकाने पूराच्या पाण्यातून एसटी चालवल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तात्काळ पुलावरील वाहतूक थांबवावी अशी मागणी देखील स्थानिकांकडून केली जात आहे. संबंधित एसटी चालकावर कारवाई होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात देखील दोन वर्षापूर्वी अशीच घटना घडली होती परंतु घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चालक व वाहक या दोघांनाही एसटी महामंडळाने निलंबित केले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत