HEADLINE

Breaking News

सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबेंचा आरोप स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषणाचा इशारा


पाली (वार्ताहर) : सुधागड तालुका हा आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. विकासाच्या नावाखाली शासनाच्या विविधांगी व कोट्यवधी निधीच्या योजना आणल्या जातात. मात्र, पाणी पुरवठ्याच्या योजनेत भ्रष्टाचाराचे पाणी मुरत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या लताताई कळंबे यांनी केला आहे. यामध्ये ठेकेदार व प्रशासनाचे संबंधित अधिकारी सामील असल्याचा आरोप कळंबे यांनी केला आहे. जल जीवन मिशन योजना, बंधारे व विहिरीत भ्रष्टाचाराचे पाणी मुरले असून, यातील भ्रष्टाचार उघड करण्यासाठी लताताई कळंबे यांनी कंबर कसली आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांच्याविरोधात लताताई कळंबे यांनी पाली पंचायत समिती कार्यालय आवारात स्वातंत्रदिनी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा रायगड जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
सदर निवेदनाची प्रत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, पोलीस अधीक्षक रायगड, तहसीलदार पाली सुधागड आदींना देण्यात आली आहे. सदर निवेदनात नमूद केले आहे की सुधागड तालुक्यात सरकारी योजनेअंतर्गत तसेच केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन व जिल्हा परिषदेच्या फंडातून बांधण्यात आलेल्या विहिरी, बंधारे, व त्यासाठी किती कोटी रुपयांचा निधी वापरला याचा प्रशासनाकडून लेखाजोगा मिळावा या मागणीसाठी पाली सुधागडच्या सामाजिक कार्यकर्त्या लताताई कळंबे यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांच्या विरोधात लताताई कळंबे यांनी 15 ऑगस्ट मंगळवारी दुपारी 2.00 वाजता स्वातंत्रदिनी पाली पंचायत समितीच्या प्रांगणात आमरण उपोषण करण्याचा इशारा रायगड जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत