भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी जिंदाल स्टील वर्क्स (जेएसडब्ल्यू) कंपनी प्रशासना विरोधात शिवसेनेचं जन-आंदोलन
पेण ( वार्ताहर ) : स्थानिकांना डावळून परप्रांतीयांची भरती करणाऱ्या पेण तालुक्यातील डोलवी येथील जिंदाल स्टील वर्क्स (जेएसडब्ल्यू) कंपनी प्रशासना विरोधात शिवसेनेने रणशिंग फुंकले असून भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेने जन आंदोलन पुकारले आहे.
या आंदोलनात पेण, अलिबाग, रोहा, सुधागड तालुक्यातील सुमारे १० हजार बेरोजगार युवक व शिवसैनिक सहभागी होणार असल्याची माहिती रायगड संपर्कप्रमुख विष्णुभाई पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवसेना नेते माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना उपनेते विजय कदम, शिवसेना रायगड संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, रायगड संपर्कप्रमुख विष्णुभाई पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर भोईर, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, सहसंपर्कप्रमुख किशोर जैन, उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे, महिला आघाडी जिल्हा संघटीका दिपश्री पोटफोडे, विधानसभा संपर्कप्रमुख चंद्रकांत गायकवाड, तालुकाप्रमुख जगदिश ठाकूर, युवासेना विस्तारक सुधीर ढाणे, युवतीसेना जिल्हा संघटीका धन्वंतरी दाभाडे, तालुका समन्वयक दिलीप पाटील, शिवदूत बाळू पाटील, पेण शहरप्रमुख मयुरेश चाचड, जिवन पाटील, समिर म्हात्रे, अलिबाग तालुकाप्रमुख शंकर गुरव, अलिबाग संघटक बंडुशेट पाटील, तालुका संघटक भगवान पाटील, विभागप्रमुख कांचन थळे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांकरिता शनिवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता कंपनीच्या गोवा गेटवर जन आंदोलन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी मध्यरात्री पासून कडक पहारा आणि सुरक्षा व्यवस्था कंपनीच्या गेटवर करण्यात आली होती.
मागण्या…
- शासनाच्या धोरणानुसार भूमिपुत्रांची ८० % भरती व्हायलाच पाहिजे.
- पेण, अलिबाग, रोहा, सुधागड, तालुक्यातील सुशिक्षित व अकुशल तरुणांना कंपनीत नोकरी मिळालीच पाहिजे.
- पाटणसई ते डोलवीमधील ४५ गावांना फिल्टर पाणी पुरवठा झालाच पाहिजे.
- कंपनीच्या बार्जेसच्या वाहतुकीमुळे लाटांनी खारबंदीस्ती बांध फुटुन पिकत्या भातशेतीत खारेपाणी शिरुन शेती नष्ट झाली. त्याठिकाणी मॅग्रोंज झुडपांची लागवड करणे.
- कंपनीमुळे ढोंबी, माचेला, गडब-कारावी येथिल सुमारे २००० एकर पिकती शेतजमिन खारबंदिस्ती अभावी नष्ट झाली. अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे.
- कंपनीच्या हवेतील प्रदुषणामुळे परिसरातील घरांवर काळ्या राखेचे थर बसले आहेत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर उपाययोजना व्हावी.
- कंपनीमार्फत रसायनयुक्त पाणी धरमतर खाडीत सोडल्याने मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या मच्छीमारांनाही नुकसान भरपाई मिळाली पाहिजे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत