HEADLINE

Breaking News

चार वर्षांपासून फरार असलेल्या अट्टल गुन्हेगाराला शिताफिने अटक

 



नागोठणे  : चार वर्षांपासून फरार असलेल्या गुन्हेगाराला पोलिसांनी सापळा लावून अटक केली. या गुन्हेगारावर विविध पोलीस ठाण्यात २० गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगाराला नागोठणे पोलिसांनी श्रीरामपूर-अहमदनगर येथून शिताफिने अटक केली.
 या कारवाईमुळे नागोठणे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१९ साली छत्रपती शिवाजी महाराज चौकात फिर्यादी नारायण तेलंगे यांना आम्ही स्पेशल पोलीस असून अंगावर एवढे दागिने घालू नका. अशी बतावणी करून दागिने फिर्यादीच्या पिशवीत ठेवायला सांगितले.

दागिने पिशवित ठेवताना गुन्हेगाराने फिर्यादीची पिशवी हिसकावून साधारण दोन लाखाचे दागिने गुन्हेगार पसार झाला होता. या गुन्ह्याची पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. नागोठणे पोलीस ठाण्यात चार-पाच महिन्यापूर्वी रुजू झालेल्या स.पो.नि. संदीप पोमन यांनी मागील अनेक गुन्हे उघडकीस आणले.

चार वर्षे फरार असलेल्या या गुन्ह्यातील आरोपीला पकडून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करीत पोलीस ठाण्यातील पीएसआय महेश धोंडे, पोलीस हवालदार विनोद पाटील व गणेश भोईर, पोलीस नाईक समीर पाटील या आपल्या सहकार्‍यांचे एक पथक तयार केले. या पथकाने गोपनीय माहितीदारांच्या मदतीने आरोपी आझाद अली सय्यद उर्फ इराणी (वय ४०, रा. कॉलेज रोड,न्यू कोर्ट इराणी मोहल्ला, श्रीरामपूर-अहमदनगर) यास श्रीरामपूर अहमदनगर येथून ताब्यात घेतले.

सदरील आरोपीवर विविध पोलीस ठाण्यात साधारण २० गुन्हे असून आरोपीला रोहा न्यायालयातील न्याय दंडाधिकार्‍यांसामोर हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास स.पो.नि. संदीप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय महेश धोंडे हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत