HEADLINE

Breaking News

लाखमोलाच्या दहीहंडी गोपाळ काल्याची ढाक्कुमाकुम आणि थरार



 
अमित गवळे

पाली, ता. 3 (वार्ताहर) गोकुळाष्टमी हा रायगड जिल्ह्यातील पारंपरिक महत्वाचा व उत्साहाचा सण आहे. जिल्ह्यात अबाल वृद्धांसह तरुणाईला गोकुळाष्टमीची ओढ लागलेली असते. पारंपारिक पेहराव व पारंपरिक वाद्याच्या चालीवर सर्वचजण श्रीकृष्ण जन्माचा उत्सव आनंदात साजरा करतात. ही दहीहंडी फोडण्याचा थरार देखील अविस्मरणीय असतो. शिवाय यंदा ठिकठिकाणी लाखो रुपयांची बक्षिसे असलेल्या दहीहंडी देखील आहेत. त्यामुळे जिल्ह्यात दहीहंडी सणासाठी सर्वत्र उत्साह संचारला आहे. 


      जिल्ह्यात भव्य दिव्य दहीहंडी महोत्सव साजरा होत आहे. गोविंदा पथकांना मोठ्या रकमेची बक्षिसे लावल्याने गोविंदांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. लाखोंची बक्षिसे असलेली दहीहंडी फोडण्याचा थरार देखील अविस्मरणीय असतो. त्यामुळे जिल्ह्यात दहीहंडी सणाला वेगळे महत्व आहे.
    कोरोनाच्या सावटामुळे दोन वर्षे दहीहंडी व गोपाळकाला साधेपणाने साजरा केला गेला. मात्र मागील वर्षीपासून गोपाळकाला पुन्हा नव्या जोमाने व उत्साहाने साजरा केला जात आहे. सुधागड तालुक्यात बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे भव्य दहीहंडी महोत्सव साजरा होत असून या उत्सवात लाखोंच्या बक्षिसांची उधळण केली जाणार आहे. बापूजी क्रीडांगण आगरआळी पाली येथे होणाऱ्या दहीहंडी महोत्सवात प्रथम क्रमांकास 1 लाख 11 हजार 111 रुपयांचे पारितोषिक व आकर्षक चषक देऊन विजेत्यास गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येकी 6 थरांच्या सलामिस 5 हजार रूपये व इतर आकर्षक बक्षिसे देखील लावण्यात आली आहेत. तसेच दहीहंडी महोत्सवा दरम्यान नृत्याविष्कार देखील सादर होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. त्यामुळे गोविंदा पथकात मोठा उत्साह दिसून येत आहे. जिल्ह्यात महाड, रोहा, पनवेल आदि इतरही तालुक्यात लाख रुपयांचे पारितोषिक असलेल्या दहीहंडी आहेत. नोकरी, व्यवसाय व शिक्षण या निमित्त मुंबई, पुणे ठाणे व इतर जिल्ह्यात असलेले तरुण आवर्जून दहीहंडी उत्सवासाठी आपल्या गावी येतात. शिवाय लाखोंचे पारितोषिक आपल्याच पथकाला मिळावे यासाठी गोविंदा महिनाभर आधीपासूनच थर रचण्याचा सराव करत आहेत. असे गोरेगाव-माणगाव येथील तरुण अनिकेत महाडिक यांनी सांगितले.


    

विशेष परंपरा
            जिल्ह्यात काही तालुक्यात गोकुळाष्टमीला विशिष्ठ परंपरा जोपासली जाते. श्रीवर्धन तालुक्यात अनेक नवस गोकुळाष्टमीच्या दिवशी पूर्ण केले जातात. प्रत्येक पाखाडीतुन स्वतंत्र दावण निघते. दावण म्हणजे पाखाडीतील तरुण लहान मुले मानवी साखळी निर्माण करतात. एकमेकांच्या हातांची गुंफण करत श्रीकृष्णाचा जयघोष करीत प्रत्येक पाखाडीतील लोक संपूर्ण गावभर भ्रमंती करतात. श्रीवर्धन गावातील प्रत्येक मंदिर, प्रत्येक पाखाडीला भेट दिली जाते. दावण हा मैत्री, एकोपा, प्रेम, आपुलकी, स्नेह याचे प्रतीक मानले जाते. सदरचा उत्सव निरंतर दोन दिवस चालतो. श्रीकृष्ण जन्म रात्री झाल्यानंतर दुसरा पूर्ण दिवस तरुणाईने नृत्य करते. शहराच्या विविध भागात विविध मंडळांकडून लावण्यात आलेल्या दहीहंडीला फोडण्याचे काम गोविंदा पथके करतात. जिल्ह्यात काही ठिकाणी नवसाची हंडी फोडली जाते. वाजत गाजत हाती गदा घेऊन फेर देखील धरला जातो. महिला व मुली देखील यात मोठ्या उत्साहात सहभागी होतात. 
       

सराव व मेहनत
   दहीहंडी सणासाठी तरुण व लहान मुले नियमित सराव करतात. खूप मेहनत घेतात. जिल्ह्यातील गोविंदा पथके वर्षभर जय्यत तयारीत आहेत. यामुळे शरीर तंदुरुस्त व निरोगी राहते. ठिकठिकाणी जाऊन दहीहंडी फोडून रोख बक्षिसे मिळविण्याकडे अनेकांचा कल असतो. या रकमेचा उपयोग विधायक व लोकोपयोगी कामांसाठी केला जातो. 


 
विधायक उपक्रम
  गोकुळाष्टमी म्हणजे फक्त दहीहंडी फोडणे इतक्या मर्यादेचा सण नाही. जिल्ह्यात या सणाला शहर, गाव, आळी व पाखाडी येथे गोपाळकाला साजरा केला जातो. गोकुळाष्टमीच्या अगोदर व दरम्यान ठिकठिकाणी सांस्कृतिक व समाजपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी कुठे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार केला जातो. तर कुठे विविध खेळ व स्पर्धा भरविल्या जातात. तर काही ठिकाणी विविध गुणदर्शन कार्यक्रम घेतले जातात. शाळा महाविद्यालयात देखील दहीहंडीची धूम पाहायला मिळते. यावेळी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात. 


कोट 
     दहीहंडी सुरक्षितपणे व खबरदारी घेऊन साजरी केली पाहिजे. बहुतांश सण हे निसर्गाचे रक्षण करणारे, कृषी संस्कृतीशी नाते सांगणारे आहेत. सण-उत्सवांच्या उद्देशाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. कारण त्यामुळे विज्ञाननिष्ठ तरुण पिढीला सण-उत्सवांचे महत्व लवकर पटेल आणि ते साजरे करतांना अधिक आनंद होईल. पर्यावरणाच्या दृष्टीनेही ते अधिक उपयुक्त ठरेल. 
हभप महेश पोंगडे महाराज, जिल्हाध्यक्ष, सत्यशोधक वारकरी संप्रदाय

कोट 
    गोपाळकाला हा आपला पारंपरिक सण आहे. त्याला हिंदू संस्कृतीत विशेष महत्व आहे. सर्व नियम पाळून दहीहंडी साजरी करण्यास काही हरकत नाही. हा सण साजरा केल्याने मरगळ व भीती जाऊन नवीन उत्साह संचारतो. वेगळी धम्माल व मज्जा असते. 
सुशील शिंदे, सामाजिक कार्यकर्ते, पाली


फोटो, पाली, दहिहंडी फोडण्यासाठी लावलेले उंच थर. (छायाचित्र, संग्रहित)

फोटो , पाली, गोपाळकाल्याची मजा लुटतांना बच्चेकंपनी. (छायाचित्र, संग्रहित)

फोटो , पाली, दहीहंडीला प्रबोधन करतांना विद्यार्थी. (छायाचित्र, अमित गवळे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत