चौक ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय मोजतंय शेवटची घटका
| रसायनी | राकेश खराडे |
खालापूर तालुक्यातील शासकीय असणाऱ्या रुग्णालयांना नेहमीच ग्रहण लागले असल्याचे बोलले जात आहे. अशातच चौक येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय हे समस्यांचे माहेर घर बनले असून हे रुग्णालय शेवटची घटका मोजत आहे अशी अवस्था झाली आहे.
खालापूर तालुक्यात मुंबई-पुणे जुना हायवेलगत असणाऱ्या चौक गावातील चौक ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय हे जणू समस्यांचे माहेरघर बनले असून अनेक अडचणींना रुग्णालय सामोरे जात आहे याचाच त्रास येथील परिसरातील रुग्णांना होताना दिसत आहे, या रुग्णालयात मंजूर पदांपैकी जवळपास पन्नास टक्के पद रीक्त असल्याने त्याचा परिणाम येथील रुग्णांना देखील होताना दिसत असून कर्मचाऱ्यांवर देखील तेवढयाच मोठ्या प्रमाणात भार आहे, या रुग्णालयात बहुतांश आदिवासी भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात येतात त्यांना व्यवस्थित रित्या जरी उपचार होत असले, तरी अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे परिचारिका यांच्यावरच भार येत असून बारा बारा तास येथील कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे याच रुग्णालयात शासनाने ठरवून दिलेले कार्यक्रम पार पाडले जातात त्यामध्ये गरोदर माता तपासणी, दंत चिकित्सा, नेत्र तपासणी तपासणी तसेच विविध प्रकारचे रक्त नमुने तपासणी अशा एक ना अनेक सुविधा देण्याचे काम उत्तम प्रकारे चालू असले तरी येथील इमारत अनेक वर्ष जीर्ण आवस्थेत पडली आहे.
ग्रामीण रुग्णालय चौक येथे कर्मचाऱ्यांच्या मंजूर असलेल्या पदांपैकी 50 टक्के पदे रिक्त असल्याने त्यामध्ये परिचारिका पदे सात मंजूर असताना तीन परीचारीका आहेत त्यातही एक परिचारिका उच्च शिक्षणासाठी रजेवर गेल्याने दोनच परिचारिका येथे कार्यरत आहेत त्यांच्यावर संपूर्ण रुग्णालयाची जबाबदारी असून या दोन्ही परिचारिका बारा बारा तास काम करत असताना दिसत आहेत, तसेच वर्ग चार या पदाचे सात मंजूर पदे असून त्यापैकी केवळ तीन पदे भरलेली आहेत औषध निर्माण अधिकारी यांचे मागील दोन वर्षांपासून पद रिक्त असल्यामुळे येथील परिचारिका यांनाच ते देखील काम करावे लागत आहे, तसेच कार्यालयातही दोन लिपिक व एक सहाय्यक अधीक्षक यांचे पद मंजूर असताना त्यातही एकच लिपिक कार्यरत आहे, महत्त्वाची बाब म्हणजे येथे डॉक्टर देखील ठेकेदारी पद्धतीवर काम करत आहे, नव्याने सुरू करण्यात आलेल्या दंत चिकिस्ता विभाग हे एका पत्राच्या खोलीमध्ये भरवण्यात येते या रुग्णालयात एकूण तीस बेडची व्यवस्था असून प्रत्येक विभागात दहा दहा बेड आहेत या रुग्णालयात गरोदर मातांचे प्रसूती चे प्रमाण मोठ्या प्रमाणात होत असून दिवसें दिवस गरोदर मातांचे प्रमाण वाढत चालले आहे, रुग्णांना जरी व्यवस्थित सुविधा भेटत असली तरी ऑपरेशन थेटर हे बंद असून ही इमारत देखील जीर्ण अवस्थेत पडली आहे.
मुंबई पुणे महामार्ग असल्याने या महामार्गांवर होणारे अपघात व अपघातग्रस्त व्यक्तीला प्रथम उपचार मिळावा म्हणून या रुग्णालयात दाखल केले जाते त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे उपचार मिळण्यासाठी येथील रुग्णालयातील अडीअडचणी दूर झाल्या पाहिजेत तरच येथे चांगल्या प्रकारे उपचार मिळू शकतील. याकरिता येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी या रुग्णालयाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
"आम्ही वेळोवेळी आमच्या वरिष्ठांकडे लेखी स्वरूपात मागणी केली असून त्यांनी आमच्या विनंती अर्जाचा विचार करावा व येथील रुग्णालयाला ज्या काही सुविधा लागतील त्याची पूर्तता त्यांनी वरिष्ठ पातळीवरून करावी येथे रुग्णांची व्यवस्था चांगल्या प्रकारे होत असून रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे आमच्याकडे असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे आम्हाला देखील काही अडचणींचा सामना करावा लागत आहे."
डॉ. सविता काळेल,
अधीक्षक चौक ग्रामीण रुग्णालय
"आम्ही माहितीच्या अधिकारात संपूर्ण माहिती घेतल्याने या रुग्णालयात जवळपास कर्मचाऱ्यांची 50% पदे रिक्त असल्याची गंभीर बाब आमच्या लक्षात आली असून या अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे रुग्णचिकेस्तेवर त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे शासनाने या रुग्णालयाकडे लक्ष देऊन ज्या काही समस्या आहेत त्याची लवकरात लवकर पूर्तता करावी."
श्री. वसंत पाटील,
अध्यक्ष माहिती अधिकार महासंघ खालापूर तालुका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत