HEADLINE

Breaking News

महाडमध्ये महामानवास अभिवादन

 


| महाड | वार्ताहर |

ऐतिहासिक महाड क्रांतीभूमीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरीनिर्वाणदिनी महामानवाला अभिवादन करण्यासाठी तमाम महाडकर, शासकीय अधिकारी, राजकीय पक्षातील कार्यकर्ते, आदींनी चवदारतळे येथे गर्दी केली होती. सकाळपासूनच जमलेल्या भीमसैनिकांनी ऐतिहासिक चवदार तळे, क्रांतीस्थंभ येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास नतमस्तक होत अभिवादन केले.

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड चवदारतळे येथे समाजिक क्रांती केली. यामुळे महाडच्या चवदार तळ्यावर अभिवादन करण्यासाठी तालुक्यातील भीमसैनिक आणि विविध क्षेत्रातील नागरिक, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. महाड मधील पंचशीलनगर, भीमनगर आणि इतर विभागात असलेल्या भीम अनुयायांनी 5 डिसेंबरच्या मध्यरात्री चवदारतळे येथे मेणबत्त्या प्रज्वलित करून आदरांजली वाहिली. दलितमित्र खांबे गुरुजी ट्रस्ट आणि बौद्धजन पंचायत समिती शाखा 55 यांच्या वतीने मेणबत्त्या प्रज्वलित केल्या गेल्या. यावेळी महाड तसेच परिसरातील भीमसैनिक, तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. शहरातील अनेक राजकीय, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी चवदार तळे येथे येवून बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष केला.

बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने देखी आनंदभुवन येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बौद्धजन पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यानी डॉ.बाबासाहेब यांना आदरांजली वाहिली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा, कोकण रिपब्लिकन, वंचित बहुजन आघाडी आदी राजकीय चळवळीतील पुढारी अभिवादन करण्यास उपस्थित होते. महाड मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, विविध शासकीय कार्यालये आणि महाड एस. टी. आगार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, आदी ठिकाणी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र बहुजन सेनेच्या वतीने देखील अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. महाड आणि परिसरातील भीम ज्योती देखील यावेळी महाड मध्ये दाखल झाल्या होत्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत