HEADLINE

Breaking News

खालापूरात 'बर्ड फ्ल्यू' ची लागण नाहीच, पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. - डॉ. रत्नाकर काळे



वावोशी/जतिन मोरे :- खालापूरात 'बर्ड फ्ल्यू' चा शिरकाव अशी बातमी ३ डिसेंबरच्या वर्तमान पत्रामध्ये छापून आली होती. या बातमीला पशुसंवर्धन विभागाकडून असहमती दाखवण्यात आली असून तालुक्यातील पशुपालकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे खालापूर तालुका सहाय्यक आयुक्त डॉ. रत्नाकर काळे यांनी केले आहे.

         यापूर्वी देखील वावोशी विभागातील परखंदे येथील कोंबड्यांच्या आजाराविषयी बातमी वर्तमानपत्रांमध्ये आली होती या अनुषंगाने त्या बातमीची तात्काळ दखल घेत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली परखंदेवाडी या ठिकाणी पशुसंवर्धन पथक पाठवण्यात आले. यानुसार पशुसंवर्धन पथकाने प्रथम परखंदेवाडी मधील पशुपालकांची भेट घेऊन तेथील कोबड्यांची पाहणी करून त्यांच्यावर उपचार व त्यासंबंधी औषधे वाटप करण्यात आली. पाहणी दरम्यान या ठिकाणच्या परिसरात कुक्कुटपालन केले जात असल्याचे दिसून आले. घरोघरी साधारण पाच ते दहा कोंबड्या असल्याचे स्थानिकांनी सांगितले. सद्यस्थितीत या ठिकाणी एकही मृतपक्ष तसेच आजारी पक्षी आढळून आला नाही यापूर्वी दोन ते तीन दिवसांपूर्वी काही पक्षी मृत झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. परंतु त्यामध्ये पक्षी पांढरे हगवण करत असल्याचे स्थानिकांनी सांगितले त्यामुळे तेथील पक्षांचे नमुने गोळा करून ते सर्वेक्षणासाठी रोग अन्वेषण प्रयोगशाळा पुणे येथे पाठवण्यात आले असल्याचे पशुसंवर्धन अधिकारी रोहिणी गायकवाड, नेत्रा अस्वर यांनी सांगितले आहे. काही वृत्तपत्रांमध्ये बर्ड फ्ल्यू या आजाराविषयी उल्लेख झाल्याचे आढळले परंतु प्रत्यक्षात स्थानिकांशी संपर्क केला असता यापूर्वी काही मृत झालेल्या पक्षांमध्ये पांढरे हगवणी सारखे लक्षणे दिसून आल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले त्यानुसार स्थानिकांनी सांगितलेल्या लक्षणावरून वाडीमध्ये औषधे वाटप करण्यात आली आहेत तसेच कोंबड्यांच्या व्यवस्थापनाबद्दल वाडीतील पशुपालकांना मार्गदर्शन देखील केले असून स्थानिकांनी घाबरून जाऊ नये असे पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या टीमकडून आवाहन देखील करण्यात आले आहे.

"वातावरणातील बदल किंवा साचलेल्या अस्वच्छ पाण्यातील जिवाणूमुळे पक्ष्यांना आजार होत असतो परंतू त्या आजारावर उपचार होत असतात. सध्या तरी बर्ड फ्ल्यू सारखी कोणतीही लक्षणे पक्ष्यांमध्ये आढळलेली नसून पशुपालकांनी घाबरून न जाता थेट पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा."

          - डॉ. रत्नाकर काळे - सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग, खालापूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत