वावोशी भिमनगरमधील महिलांना स्वच्छता आणि मत्स्य उत्पादनाची हाताळणी व मूल्यवर्धन“ या विषयावर प्रशिक्षण, केंद्रीय मत्स्य प्रौद्योगिक संस्थेच्या मुंबई संशोधन केंद्राचा स्तुत्य उपक्रम
भारतीय कृषी संशोधन परिषद तथा केंद्रीय मत्स्य प्रौद्योगिक संस्थेच्या मुंबई संशोधन केंद्र महाराष्ट्रातील समुदायासाठी दरवर्षी तीन दिवसीय प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करते. त्या अनुषंगाने खालापूर तालुक्यातील वावोशी भिमनगर येथे अनुसूचित जाती उपयोजना योजनेंतर्गत २० डिसेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीत “स्वच्छता आणि मत्स्य उत्पादनाची हाताळणी व मूल्यवर्धन“ हा कार्यक्रम संपन्न झाला. केंद्रीय मत्स्य प्रौद्योगिक संस्थेच्या मुंबई संशोधन केंद्राचे वाशी, नवी मुंबईचे प्रभारी वैज्ञानिक डॉ. अभय कुमार आणि कार्यक्रम समन्वयक यांनी ‘मासे आणि मत्स्य उत्पादनाची स्वच्छता आणि हाताळणी मूल्यवर्धन' या विषयावर महिलांना प्रशिक्षण व प्रात्यक्षिक करून दाखवले. या कार्यक्रमात माशांची साफसफाई आणि कटिंग करताना व त्यापासून पदार्थ बनवताना स्वच्छता कशी राखावी आणि फिश लोणचे, फिश बॉल, फिश कटलेट, फिश फिंगर आणि बटरफ्लाय कोळंबी इत्यादी विविध मूल्यवर्धित मत्स्य उत्पादनांची तयारी कशी करावी याचे प्रात्यक्षिकही प्रशिक्षणार्थींना करून दाखवण्यात आले. भीमनगर वावोशी मधील पंचशील महिला बचत गटाच्या विशेष प्रयत्नाने आयोजित केलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात एकूण २१ महिला स्पर्धकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. या कार्यक्रमादरम्यान सहभागी महिला प्रशिक्षणार्थींना त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांचा छोटासा अन्न उपक्रम सुरू व्हावा या हेतूने त्यांना इन्सुलेटेड फिश बॅग (सीआयएफटी द्वारा विकसित), आईस बॉक्स, मीट मायनसर, सीलिंग मशीन, वेट मशीन, प्रेशर कुकर, गॅस स्टोव्ह आणि मिक्सर अशी विविध उपकरणे संस्थेकडून देण्यात आली. या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान वावोशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच दीपा शिर्के, माजी उपसरपंच सुनीता भालेराव, सीआरपी आश्र्विनी मोरे, अंगणवाडी सेविका पल्लवी मोरे, भारतीय कृषी संशोधन परिषद तथा केंद्रीय मत्स्य प्रौद्योगिक संस्थेच्या मुंबई संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. अभयकुमार, डॉ. रेहाना राज, श्रवणकुमार शर्मा, संगीता गायकवाड, मुख्य तांत्रिक अधिकारी तुळशीराम वाघमारे, वरिष्ठ तंत्रज्ञ सहाय्यक सूरज पाटील व भिमनगर मधील महिला वर्ग आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत