आमचे जंगल आमची जबाबदारी लोकसहभागातून वन व्यवस्थापन जंगलांचे शाश्वत व्यवस्थापनासाठी सामूहिक वनहक्क समिती मजरे जांभुळपाडा रायगड जिल्ह्यातील पहिले गाव रिसोर्स मॅप तयार
अमित गवळे
पाली, ता. 17 (वार्ताहर) सुधागड तालुक्यातील सामूहिक वन हक्क मान्यता प्राप्त मजरे जांभुळपाडा, गावामध्ये स्थानिक सामूहिक वन व्यवस्थापन समितीच्या वतीने जंगलाचे शाश्वत नियोजन करण्याच्या उद्देशाने रिसोर्स मॅप बनवण्यासाठी शनिवारी (ता.16) सायंकाळी गाव सभेचे आयोजन करण्यात आले होते. या गावसभेत गावातील सर्व नागरिकांच्या समोर या गावाला मान्यता प्राप्त सामुहिक वनहक्क वन क्षेत्राचे सूक्ष्म नियोजन दर्शविणारा रिसोर्स मॅप तयार करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील ही पहिली सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती आहे.
वनहक्क कायदा २००६ नुसार जंगलाच्या शाश्वत व्यवस्थापनासाठीचे अधिकार हे गावसमाजाकडे देण्यात आले आहेत. जंगलाच्या सरंक्षण आणि व्यवस्थापनामध्ये जनसमूहांचा कृतिशील सहभाग मिळवणे हा या अधिकार हस्तांतरणामागील उद्देश आहे. वनहक्क कायदा २००६ चे कलम ३(१) अंतर्गत मजरे जांभुळपाडा या गावाला २०१९ साली सामुहिक वनहक्काचे आधिकार प्राप्त झाले आहेत. या हक्काअंतर्गत गावाच्या सीमांतर्गत किंवा सीमा बाहेर पारंपारिकरित्या गौण वनउपज गोळा करणे, त्यांचा उपयोग, संग्रह व विक्री करनेसाठी स्वामित्वाचा आधिकार देण्यात आले आहेत. परंतु, वन हक्क कायदा २००६ नुसार जसे आधिकार देण्यात आले आहेत तसेच वनहक्क धारकांची भूमिका आणि जबाबदाऱ्यांची निश्चिती करण्यात आली आहे. वहका २००६ चे नियम ५ नुसार प्रत्येक वनहक्क धारकांना जंगलांचे शाश्वत व्यवस्थापन करणे बंधन कारक केले आहे.
वातावरण फाऊंडेशन द्वारे सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समिती, मजरे जांभूळपाडा, यांनी सामूहिक वन हक्क क्षेत्रात घेण्यात येणारे भविष्यातील नियोजनाचे प्रतिचित्र जमिनीवर रेखाटले. त्यानंतर मजरे जांभूळपाडा मधील सर्व ग्रामस्थांनी जमिनीवर संसाधन नकाशा काढला यामध्ये जंगल संवर्धन, संरक्षण आणि व्यवस्थापन कशा प्रकारे करण्यात येणार हे रेखाटले व सामूहिक वन क्षेत्रात असलेल्या ठिकाणची स्थानिक मान्यतेची नावे या नकाशामध्ये दिली गेली आहेत., तसेच पूर्वी पासून असणाऱ्या वाटा किंवा पायरस्ते दाखवले गेले व वृक्षरोपण कुठे करण्यात येणार आहे हे दाखवले आहे. यातून असे सिद्ध होते कि मजरे जांभूळपाडा सामूहिक वन क्षेत्र प्रत्येक सदस्याला त्यांच्या मौल्यवान जंगलाचे संरक्षक बनवते व मोठया उत्साहाने जंगलाचे व आपले नाते ते दाखवत होते. तसेच सामूहिक वन हक्क क्षेत्रामध्ये असणारे वृक्ष आणि वृक्षारोपण विविध भागात करण्यात येणारी इतर कामे , करण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीसाठी शाश्वत पाणीपुरवठा करणेसाठी दोन वनतलाव खोदण्यात येणाऱ्या जागा, बंधारे, यांचा समावेश करण्यात आला आहे जेणेकरून वृक्ष व जंगलीप्राणी यांना त्याचा फायदा होईल आणि पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. सामूहिक क्षेत्राच्या विकासाच्या माध्यमातून पर्यावरण राखले जाईल व मोठ्या प्रमाणात होणारे आदिवासी समुदायचे स्थलांतर रोखण्यास याची मदत होणार आहे. असे मत तालुका समन्वयक शिवाजी हिरडे, यांनी व्यक्त केले. हा रिसोर्स मॅप तयार करण्यासाठी आदिवासी वाडीतील महिला, पुरुष. मुले व वयोवृद्ध जानकार उपस्थित होते. तसेच हिरडे, यांनी तांत्रिक सहाय्य पुरवले.
कोट 1
रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती, मजरे जांभुळपाडा म्हणजे आम्ही केली आहे. अशीच आदर्शवत भूमिका जिल्ह्यातील इतर सामूहिक वनहक्क प्राप्त गाव समाजानेही घ्यावी. तसेच जंगले सांभाळण्यासाठी समाजातील इतर घटकांनी सुद्धा आमच्या वनक्षेत्रात योगदान करावे.
भारती पवार, खजिनदार ग्रामसभा (रोहयो), मजरे जांभूळपाडा आदिवासी वाडी
कोट 2
खाऱ्यार्थाने जंगलांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आजपर्यंत शोध लागलेल्या एकाही ग्रहावर झाडाचे अस्तित्व सापडले नाही. त्यामुळे साहजिकच या ब्रम्हांडातील सर्वात अमूल्य गोष्ट ही झाडे / जंगले आहेत. हि बाब जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर सर्वांनी स्वीकारून जंगलांचे संवर्धन करण्यात आपले योगदान दिले पाहिजे.
राहुल सावंत, लिड- प्रोग्राम आणि कँपेन्स, वातावरण फाऊंडेशन
कोट 3
ज्या जंगलांनी आजपर्यंत आम्हाला जगवलं आणि जागवलं त्या जंगलाला आता सांभाळण्याची जबाबदारी आमची आहे.
सुभाष जाधव, सचिव- सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती, मजरे जांभूळपाडा
चौकट 1
रिसोर्स मॅप म्हणजे?
रिसोर्स मॅप म्हणजे या गावाच्या सामूहिक वनहक्क क्षेत्राचे सूक्ष्म नियोजन करणे होय. कोणतीही जंगले टिकवायची असतील तर त्यांचे शास्त्रीय नियोजन करणे गरजेचे असते. त्या शिवाय जंगलांचा शाश्वत संभाळ करता येणे शेकी नाही आणि म्हणूनच आम्ही आमच्या गावाला वनहक्क कायदा २००६ अंतर्गत मान्य झालेल्या सामूहिक वनहक्क क्षेत्राचे सूक्ष्म नियोजन करण्यासाठी गाव सभेचे आयोजन करुन जंगलाचा रिसोर्स मॅप तयार केला आहे. ज्याद्वारे आम्ही भविष्यात आमच्या जंगलांचे कसे नियोजन करणार आहोत याचे मुर्त स्वरुपातील चित्र गाव समाजासमोर मांडले आहे. असे मत सुभाष जाधव, सचिव, सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती, मजरे जांभूळपाडा यांनी व्यक्त केले. मजरे जांभूळपाड्याच्या आयोजित गाव सभेत ते बोलत होते.
चौकट 2
वनांचे संरक्षण व संवर्धन
वनांचे संरक्षण व संवर्धन हे शास्त्रीय व सूक्ष्म नियोजनाशिवाय शक्य नाही. आणि हे सूक्ष्म नियोजन स्थानिक लोकसमूदायांच्या कृतिशील सहभागा शिवाय होऊ शकत नाही. असे मत राहुल सावंत, लिड- प्रोग्राम आणि कँपेन्स, वातावरण फाऊंडेशन यांनी मांडले. ते म्हणाले की, सरकारच्या ताब्यात असणारी जंगले शाश्वत नियोजन व व्यवस्थापनासाठी गाव समाजला खुली कारणे ही या वनहक्क कायद्यातील क्रांतिकारी भूमिका आहे.
चौकट 3
स्थलांतर रोखण्यासाठी
आम्ही केलेले नियोजन हे आमच्या गावातील स्थलांतर रोखण्यासाठी आणि आम्हाला स्थानिक जागेवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे आम्हाला गाव सोडून परमुलखाला जाण्याची गरज पडणार नाही. आम्ही गावात राहिल्यामुळे आमच्या मुलांना शिक्षणाच्या संधी मिळणार आहेत. आमच्या दैनीय आयुष्यात स्थिरता मिळण्यासाठी आम्हाला ही चालून आलेली नामी संधी आहे. ती आम्ही वया जाऊ देणार नाही. आम्ही आजपर्यंत जंगले सांभाळली आहेत आणि इथून पुढेही सांभाळणार आहोत असे मत अनंता वाघमारे, अध्यक्ष, सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती, मजरे जांभूळपाडा यांनी मांडले.
चौकट 4
गेल्या वर्षभरापासून वन व्यवस्थापनासाठी लोकसहभाग मिळवण्या करीता वातावरण फाऊंडेशनच्या वतीने सुधागड तालुक्यातील 17 गावांमध्ये काम सुरू आहे. काम करत असलेल्या सामूहिक वनहक्क मान्यता प्राप्त मजरे जांभूळपाडा या गावाच्या सामूहिक वनहक्क क्षेत्रामध्ये ४ नोहेंबर २०२३ रोजी स्थानिक सामूहिक वनहक्क व्यनस्थापन समिती, वन विभाग व वातावरण फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या शिवारफेरी दरम्यान शाश्वत वनीकरणाचे धेय्य गाठण्यासाठी मजरे जांभूळपाड्याच्या जंगलामध्ये जल व मृदा संधारणाची कामे केली जाऊ शकणाऱ्या वन क्षेत्रांची निश्चिती करुन त्या वन क्षेत्रांवरील शास्त्रीय उपचारांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या शिवार फेरी दरम्यान मिश्र वृक्ष लागवड, बांबू लागवड, वनतलाव, सिमेंट नाला बांध, गॅबियन बंधारा, लुज बोल्डर स्ट्रक्टर्स (एलबीएस), जाळ रेषा आणि रोपवाटीका तयार करणे अशा कामांची निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या कामांची ठिकाणे आणि कामे या रॉसर्स मॅप वर दर्शवण्यात आली आहेत.
फोटो ओळ, पाली, रिसोर्स मॅप बनवितांना ग्रामस्थ व अधिकारी. (छायाचित्र, अमित गवळे)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत