HEADLINE

Breaking News

मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स मैदानात होणाऱ्या ऐतिहासिक धम्मपरिषदेचे साक्षीदार व्हा, नरेंद्र गायकवाड यांचे रायगडमधील भिम अनुयायांना आवाहन


वावोशी/जतिन मोरे :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत १६ डिसेंबर रोजी मुंबई मधील रेसकोर्स मैदान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बौद्धधम्म परिषदेचे साक्षीदार व्हा असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी केले आहे. अलिबाग या ठिकाणी मुंबईत होणाऱ्या जागतिक धम्म परिषदेच्या पार्श्वभूमीवर व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या विविध विषयांवर घेतलेल्या महत्वपूर्ण बैठकीमध्ये ते बोलत होते.

           महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुर येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दिक्षा घेऊन ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन घडवले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १६ डिसेंबर १९५६ रोजी मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स मैदान येथे बौद्ध धम्मदिक्षा सोहळा आयोजित करण्याचा संकल्प जाहिर केला होता. मात्र त्या पूर्वीच ६ डिसेंबर १९५६ रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे महालक्ष्मी रेसकोर्स मैदानात धम्मदिक्षा सोहळा आयोजित करण्याचा त्यांचा संकल्प अधुरा राहिला. तो संकल्प पूर्ण करण्यासाठी यंदा १६ डिसेंबर २०२३ रोजी ऐतिहासिक धम्मपरिषद मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स वर आयोजित करण्यात येत असून या जागतिक धम्म परिषदेला धम्मगुरु दलाई लामा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब उपस्थित राहणार आहेत. या अनुषंगाने या जागतिक धम्म परिषदेला रायगडमधून भीम अनुयायांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी केले आहे. यावेळी त्यांच्यासमवेत रिपाईचे जिल्हा सरचिटणीस एम. डी. कांबळे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद महाडिक, कोकण नेते राहुल डाळिंबकर, सुमित मोरे, सुशांत सकपाळ, रवींद्रनाथ ओव्हाळ, मोहन खांबे, अशोक गोतारणे, रायगडमधील रिपाईचे सर्व तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत