रिक्षा चालकाची मुलगी झाली सीए खडतर मेहनत जिद्द व चिकाटीने यश केले संपादित
अमित गवळे
पाली- (वार्ताहर) प्रतिकूल परिस्थितीवर मात करूननिश्चित ध्येयाने मार्गक्रमण करीत खडतर मेहनत जिद्द व चिकाटीने पालीतील शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी चैत्राली निगडे सीए झाली आहे. तिचे वडील रिक्षा चालक आहेत. पालीवाला महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे मंगळवारी (ता.23) चैत्रालीचा सन्मान करण्यात आला.
यावेळी चैत्रालीने आपल्या या यशाचा खडतर प्रवास उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थ्यांना सांगितला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच तिला मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांचे आभार मानले.
सुधागड एज्युकेशन सोसायटीचे सचिव रविकांत घोसाळकर, प्राचार्य डॉ. सुधाकर लहूपचांग यांच्या हस्ते भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन तिचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. स्नेहल बेलवलकर, प्रा. संतोष भोईर, प्रा. कृष्णा जांबेकर, प्रा. डॉ. भारती आरोटे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अनिल झेंडे , ग्रंथालय प्रमुख लिंताज उके, प्रा. जालेंदर कालकुटे, चैत्रालीचे आई व वडील, भाऊ, बहिण व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणिज्य विभागाचे प्रा. संतोष भोईर व आभार प्रा. कृष्णा जांबेकर यांनी केले. महाड-माणगाव-पोलादपूर चे आमदार भरत गोगावले यांनी सुद्धा चैत्राली हिचा सन्मान केला आहे. तसेच सुएसोचे अध्यक्ष वसंतराव ओसवाल, उपाध्यक्ष रवींद्र लिमये, कार्यवाह गीता पालरेचा यांनी सुद्धा अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
चौकट
चैत्रालीचा खडतर प्रवास
चैत्राली बाळू निगडे हिचे माणगाव तालुक्यातील भिरा (विठ्ठलनगर) हे छोटेसे निसर्गाच्या कुशीत लपलेले मुळगाव आहे. तिची आई गृहिणी, वडील रिक्षा चालक आहेत. तिला एक भाऊ व तीन बहीणी आहेत.
चैत्रालीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण टाटा विद्यालय भिरा येथे झाले. तर 11 वी, 12 वी सुऐसो. ज्युनियर कॉलेज कोलाड येथे, तर पदवीचे शिक्षण ज. नौ. पालीवाला कॉलेज पाली येथे झाले. तिने युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई मधून पदव्युत्तर पदवी मिळवली.
चैत्राली सीए होण्यासाठी 8 वर्ष मेहनत घेत आहे. या परीक्षेत तिला चार वेळा अपयश देखील आले. मात्र तिने मागे फिरून पाहिले नाही या सर्व अपयशांना पचवत कठोर मेहनत, जिद्द आणि अथक परिश्रम याच्या जोरावर अखेर तिने सीएची परीक्षा पास केली. तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ती सध्या एका खाजगी कंपनीत अकाउंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.
फोटो ओळ, पाली, शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालय वाणिज्य विभागातर्फे चैत्राली निगडी चा सन्मान होताना यावेळी उपस्थित प्राचार्य, प्राध्यापक, तिचे आई वडील व मान्यवर. (छायाचित्र, अमित गवळे)
फोटो ओळ, पाली, चैत्रालीला काजू कतली भरवून अभिनंदन करतांना तिचे मार्गदर्शक प्रा. संतोष भोईर. (छायाचित्र, अमित गवळे)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत