कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी वासांबे ग्रामपंचायतीच्या चार ग्रामसेवकांवर अखेर कारवाई .
रायगड जिल्हयातील बहुचचित श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणाऱ्या वासांबे ग्रामपंचायतीच्या चार ग्रामसेवकांवर रायगड जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी अखेर कारवाईचे आदेश दिले आहेत.
जनजागृती ग्राहक मंचाचे संपर्क व प्रसिद्धी प्रमुख श्री संतोष विचारे यांनी सन २०१८ ते २०२१ या तीन वर्षाच्या कालावधीतील भ्रष्टाचार व अनियमिते बाबत ग्रुप ग्रामपंचायत वासंवे मोहोपाडाचे सरपंच, १७ सदस्य व चार ग्रामसेवक यांच्यावर कारवाईची मागणी रायगड जिल्हा परिषदेचे तात्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यांनी सदर प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देऊन दोषी असलेल्या सरपंच व १७ सदस्य यांना ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम 39 (1) प्रमाणे अपात्र केले होते. परंतु सदर प्रकरणात दोषी असलेल्या चार ग्रामसेवकांवर म्हणजेच 1) श्री संजय बडे 2) संभाजी केंद्रे 3) मोहन दिवकर 4) भास्कर पालकर या चार
ग्रामसेवकांवर कोणतीही कारवाई केली नव्हती.
याबाबत जनजागृती ग्राहक मंचाचे जिल्हाध्यक्ष श्री मंगेश माळी यांनी, संपर्क व प्रसिद्धी प्रमुख श्री संतोष विचारे यांनी व रसायनी शाखा अध्यक्ष संदीप पाटील यांनी सतत पाठपुरावा केला होता. सदर पाठपुराव्याला यश येऊन रायगड जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मा. कोकण आयुक्त यांच्याकडील खातेनिहाय चौकशी अहवालानुसार सदर चार ग्रामसेवकांवर कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी व ग्रुप ग्रामपंचायत वासांबेच्या कामकाजात अनियमितता केल्याप्रकरणी 1) श्री संजय बडे 2) श्री संभाजी केंद्रे 3) श्री मोहन देवकर 4) श्री भास्कर पालकर यांच्यावरील दोषारोप सिद्ध झाल्यामुळे त्यांचे पुढील दोन वेतन वाढी कायमस्वरूपी रोखण्याचे आदेश खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिले आहेत.
सदर कारवाईचे लेखी पत्र जिल्हापारीषदेने श्री. संतोष विचारे यांना पाठवले आहे. सदर प्रकरणात वसुलीची कारवाई न केल्यास रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प) श्री राजेंद्र भालेराव व खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या चौकशीची मागणी करणार असल्याचे जनजागृती ग्राहक मंचाचे जिल्हाध्यक्ष श्री. मंगेश माळी व संपर्क व प्रसिद्धीप्रमुख श्री संतोष विचारे यांनी सांगितले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत