HEADLINE

Breaking News

ताम्हीणी घाटातून जाणारी वाहतूक 5 ऑगस्ट पर्यंत बंद






अमित गवळे 


पाली, ता. 2 (वार्ताहर) माणगाव मार्गे ताम्हीणी घाटातून जाणारा रस्ता पुणे जिल्ह्याच्या हद्दीत खचल्याने शुक्रवारी (ता.2) दुपारी बारा वाजल्यापासून सोमवारी (ता.5) सकाळी आठ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी यांनी याबाबत सूचना जाहीर केली आहे. 


    जिल्हाधिकारी यांनी आदेशात नमूद केले आहे की पुणे ते माले गाव ते पुणे रायगड जिल्हा हद्द ते माणगाव राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 एफ चे रुंदीकरणाचे कामकाज चालू असून पुणे जिल्हयाला अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 एफ वरील ताम्हिणी घाट क्षेत्रात अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मौजे आदरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 एफ वर साखळी क्र. 63/000 येथे दरड कोसळल्यामुळे महामार्ग पूर्णतः बंद केला होता. सदरच्या दुर्घटनेमुळे महामार्गाच्या कडेला महामार्गाच्या हद्दीत पिकनिक फॅमिली हॉटेलमधील एक व्यक्ती मयत व एक व्यक्ती जखमी झाला होता.

आणि  दिनांक 01 ऑगस्ट 2024 रोजी मौजे आदरवाडी व डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 एफ वरील साखळी क्र.61/650 ते 61/680 मध्ये रस्त्याला एका बाजूने अतिवृष्टीमुळे तडा गेला असून रस्ता खचलेला आहे. सदरचे ठिकाण हे ताम्हिणी घाट वन परिसर क्षेत्रात असून अतिमुसळधार पावसामुळे रस्ता एका बाजूने खचलेला आहे. रस्ता खचलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम चालू आहे व वाहतूक सुरक्षितेच्या दृष्टीने उपाययोजना करणे सुरु असून आता महामार्गावरील वाहतूक सदर ठिकाणी एका बाजूनेच चालू ठेवलेली आहे. तसेच पुढील काही दिवसात अतिवृष्टी झाल्यास सदर रस्ता अजून खचून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर महामार्गावरुन नियमित वाहतूक ठेवणे धोकादायक आहे. तरी शनिवार व रविवार या दिवशी ताम्हिणी घाट परिसर क्षेत्रात पर्यटनासाठी अनेक लोकांची गर्दी होत असून राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 एफ हा बंद करणे आवश्यक आहे. त्याअर्थी मी डॉ. सुहास दिवसे, जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पुणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार व शासन गृह विभागाचे दि. 19/05/1990 चे अधिसूचनेनुसार प्राप्त झालेल्या अधिकाराने मौजे आदरवाडी व डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 एफ वरील रस्त्याला एका बाजूस अतिवृष्टीमुळे तडा गेला असून रस्ता खचलेला असल्याचे दिसून येत आहे. तरी त्या ठिकाणी दुर्घटना टाळणेच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 एफ हा रस्ता दि 02 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12:00 पासून ते दि 05 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 08:00 वाजेपर्यंत बंद करण्यात येत आहे. असे आदेशात नमूद केले आहे. 



चौकट 

एसटीचा मार्ग बदलला 

    माणगाव मार्गे ताम्हिणी घाटातून जाणारा रस्ता पुणे जिल्ह्यात हद्दीत खचल्याने दोन ऑगस्ट दुपारी बारा वाजल्यापासून पाच ऑगस्ट सकाळी आठ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. म्हणून रोहा अक्कलकोट ही बस पाली मार्गे फिरवण्यात आलेली आहे. या मार्गावरून पुण्याकडे जाणाऱ्या इतरही काही बस आहेत त्यांचाही मार्ग बदलण्यात आलेला आहे 





फोटो ओळ, पाली, ताम्हिणी घाटात दरड कोसळलेले ठिकाण. 


फोटो ओळ, पाली, ताम्हिणी घाटात दरड कोसळलेले हॉटेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत