शिक्षण सप्ताहात रमले विद्यार्थी राजिप नवघर शाळेत विविध उपक्रमांसह उत्साहात साजरा
Amit gavle
पाली, ता. 1 (वार्ताहर) राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त २२ जुलै ते २८ जुलै या कालावधीत शासनाच्या निर्देशानुसार सुधागड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा नवघर येथे शिक्षण सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी दर दिवशी आयोजित विविध उपक्रमात विद्यार्थी मनःपूर्वक रमले होते. तसेच विविध गोष्टी त्यांना नव्याने शिकायला व अनुभवायला मिळाल्या.
पहिल्या दिवशी " अध्ययन अध्यापन साहित्य दिवस " हा उपक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी " अन्न व भाजीपाला ", "स्थानिक बाजारपेठ ", "माझे कुटुंब " या विषयावर सुंदर तक्ते तयार केले. तसेच विद्यार्थ्यांनी कागद व इतर साहित्य वापरून विविध खेळणी तयार केली.पुठ्ठा व पेपर वापरून विविध आकारच्या रंगीत पेट्या तयार केल्या. कार्ड पेपर वर भाजी, फळे यांचे ठसे उमटवले.
दुसऱ्या दिवशी " पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान" उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध भौमितिक आकाराच्या सुंदर रांगोळ्या काढल्या. विविध भाषिक खेळ व गणिती खेळ घेण्यात आले तसेच मुळाक्षर व अंकांची गाणी घेण्यात आली.सदर दिवशी शाळेतील सर्व शिक्षक यांनी निपुण प्रतिज्ञा घेतली.
तिसऱ्या दिवशी " क्रीडा दिन " साजरा करण्यात आला. या मध्ये देशी खेळ घेण्यात आले. लंगडी, दोरी उड्या, लगोरी, चमचा लिंबू, भोवरा, सापशिडी, बुद्धिबळ, सुईदोरा असे खेळ घेण्यात आले.
चौथ्या दिवशी विद्यार्थ्यांना सृजनशिलतेला वाव देण्याच्या हेतूने “सांस्कृतिक दिन” साजरा करण्यात आला. या मध्ये १ ली ते ८ वीतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन लोक नृत्य, पारंपारीक नृत्ये सादर केली. ६ वीतील विद्यार्थी हर्षल सुतार याने लोकगीते व ओव्या सादर केल्या. या दिवशी विद्यार्थ्यांनी खूपच धमाल केली.
पाचव्या दिवशी "कौशल्य शिक्षण " उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांकडून शाळेमध्ये प्रत्यक्ष बागकाम करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शाळेत वांगी, मिरचीच्या रोपांची लागवड करून परसबाग बाग तयार करून बागकामचा अनुभव घेतला. मातीकाम अंतर्गत मातीची खेळणी, मूर्ती तयार करण्यात आल्या. परिसरातील व्यवसायांची माहिती होण्यासाठी गणपती कारखाना, सुतारकाम इत्यादी व्यवसायांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कामकाज कसे चालते याचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. तसेच प्रथमोपचार पेटीतील साहित्य व त्याचा वापर करण्याचे प्रात्यक्षिक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना करून दाखवले.
सहाव्या दिवशी शाळेत "मिशन लाईफच्या दृष्टिक्षेपात इको क्लब "अंतर्गत शाळेत इको क्लबची स्थापना करण्यात आली. "प्लॅन्ट फॉर मदर " हा उपक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांच्या माता ना शाळेत आमंत्रित करून त्यांच्या हस्ते शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. लागवड केलेल्या रोपांना मुलाचे व आईचे नाव देण्यात आले.
सातव्या दिवशी ग्रामस्थ, पालक, व्यवस्थापन समिती व दानशूर व्यक्ती यांना शाळेत आमंत्रित करून समुदाय सहभाग विषयी शाळेचे मुख्याध्यापक अनिल राणे यांनी शाळेच्या विकासात समुदाय सहभाग ही संकल्पना स्पष्ट करून सांगितली. तसेच "विद्द्यांजली " हा भारत सरकारच्या शिक्षण विभागच्या वतीने चालवलेला एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. लोकसहभागातून शाळेचे सक्षमिकरण करणे, शाळा व समाज या मध्ये उत्तम नातेसंबंध निर्माण करणे या करीता शाळेचे विद्द्यांजली पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे या बाबत माहिती दिली. समुदाय सहभाग अंतर्गत रामकृष्ण फाउंडेशन च्या मंजुळा गोपाळ यांच्या मार्फत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शेवटच्या दिवशी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना स्नेहभोजन व मिष्टांन्न देण्यात आले. स्नेहभोजन व शैक्षणिक साहित्य प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
शिक्षण सप्ताह नियोजनपूर्वक पार पाडण्या साठी सुधागडचे गटशिक्षणाधिकारी सादुराम बांगारे व पेडली केंद्राचे केंद्र प्रमुख सुरेश उमटे यांनी मार्गदर्शन केले तसेच शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, पालक, रामकृष्ण फाउंडेशन, मंजूळा गोपाळ यांनी मोलाचे सहकार्य केले. हा शिक्षण सप्ताह यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक प्रमोद म्हात्रे, संगीता बैकर, वृषाली गुरव, शीतल पाटील, अनुजा माने, अंकिता जाधव व सर्व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.
सर्व देणगी दात्यांचे शाळेचे मुख्याध्यापक अनिल राणे यांनी आभार मानून शिक्षण साप्ताहाची यशस्वी सांगता करण्यात आली.
फोटो ओळ, पाली, शिक्षण सप्ताहाच्या विविध दिवशी आयोजित उपक्रमात सहभागी विद्यार्थी. (छायाचित्र, अमित गवळे)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत