आधुनिक सावित्री स्वतःची किडनी दान करून वाचवले पतीचे प्राण जागतिक अवयवदान दिनानिमित्त गौरव
अमित गवळे
पाली, ता. 5 (वार्ताहर) पतीला कोरोनाने ग्रासले आणि या कोरोनामुळे पतीच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या, त्यानंतर पतीचे आयुष्य हे डायलिसिस वर सुरू झाले. किडनी प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नव्हता, मग पतीचा जीव वाचवण्यासाठी पत्नीने आपली किडनी दान करून पतीला नवीन आयुष्य दिले. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील मोहनलाल सोनी विद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी मंजिरी महेश मुणगेकर-भाटकर यांनी मागील वर्षी आपल्या पतीला किडनी दान केली. शनिवारी (ता. 3) जागतिक अवयव दानदिनानिमित्त त्यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला.
आता हे दोघे पतीपत्नी निरामय आयुष्य जगत आहेत. यावेळी मंजिरी यांनी आपले अनुभव व अवयव दानाचे महत्व सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक दिलीप कासारे व शिक्षिका संध्या कासारे यांनी अवयव दानाचा संकल्प आठ वर्षांपूर्वी केला आहे. या दिवसाचे औचित्य साधून त्यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला. जनता शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा शितल तोडणकर यांच्या हस्ते व संचालक रमेश घरत व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत मंजिरी महेश मुणगेकर-भाटकर व कासारे दांपत्याचा गौरव करण्यात आला.
फोटो ओळ, पाली, मंजिरी महेश मुणगेकर-भाटकर यांचा गौरव करताना शाळेचे पदाधिकारी मुख्याध्यापक व शिक्षक वृंद. (छायाचित्र, अमित गवळे)
फोटो ओळ, पाली, मंजिरी महेश मुणगेकर-भाटकर व महेश मुणगेकर. (छायाचित्र, अमित गवळे)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत