HEADLINE

Breaking News

"होळी करा लहान, पोळी करा दान" उपक्रमास खोपोलीत उत्स्फूर्त प्रतिसाद


खोपोली, १३ मार्च २०२५: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, खोपोली शाखेच्या वतीने राबविण्यात आलेल्या "होळी करा लहान, पोळी करा दान" या उपक्रमास खोपोलीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमाचा उद्देश पर्यावरण स्नेही होळी साजरी करणे आणि गरजू व्यक्तींना अन्नदान करणे हा होता.

भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणाचे एक वेगळे महत्त्व आहे. त्यापैकी होळी हा सण संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी पुरणपोळी अर्पण करण्याची परंपरा आहे. "होळीमध्ये दृष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा" या उद्देशाने अनेक ठिकाणी पुरणपोळ्या जाळल्या जातात. तथापि, संपूर्ण महाराष्ट्रात हजारो पुरणपोळ्या होळीत जाळल्या जातात, तर दुसरीकडे अनेक गरजू व्यक्ती उपाशी राहतात. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, खोपोली शाखेच्या वतीने "होळी करा लहान, पोळी करा दान" हा उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत नागरिकांनी पुरणपोळी जाळण्याऐवजी त्या गरजूंपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन करण्यात आले होते.

दिनांक ११ मार्च २०२५ रोजी खोपोलीतील विविध रहिवासी सोसायट्यांना आवाहनपर पत्र देण्यात आले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत गगनगिरी सोसायटी, अरिहंत सोसायटी, कमलाबेन सोसायटी, उषानगर सोसायटी आणि कृष्णा रेसिडेन्सी या सोसायट्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. होळीच्या दिवशी या सोसायट्यांनी नैवेद्य म्हणून होळीला ठेवलेल्या पुरणपोळ्या समितीच्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्त केल्या. समितीच्या कार्यकर्त्यांनी या पोळ्या लौजी येथील वाडी, चिंचवली येथील वाडी, नाट्यगृहाजवळ तात्पुरता निवारा करून राहणारे कुटुंबे, शास्त्रीनगर पुलाजवळील वस्ती, तसेच रेल्वे स्टेशन परिसरातील वस्ती येथे उपस्थित असलेल्या गरजू लोकांना वितरित केल्या. पोळ्या स्वीकारताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद विशेष उल्लेखनीय होता.

पर्यावरण स्नेही होळी साजरी करण्यासाठी झाडे तोडण्याचे टाळावे, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या होळ्या पेटवण्याऐवजी संपूर्ण परिसरात प्रतीकात्मक होळी पेटवावी, बोंबा मारणे, अपशब्द उच्चारणे, अनुचित वर्तन करणे यापासून दूर राहावे, होळीमध्ये पोळी जाळण्याऐवजी ती गरजू व्यक्तींना द्यावी, "आपल्यातील दुर्गुणांची होळी करा" – वाईट सवयी, गैरप्रवृत्ती आणि अंधश्रद्धा यांचा त्याग करण्याचा संकल्प घ्यावा, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नैसर्गिक कोरड्या रंगांनी धुलिवंदन व रंगपंचमी खेळावी, होळीच्या अग्नीत प्लास्टिक, टायर, रबर किंवा अन्य हानिकारक पदार्थ टाकू नयेत, तसेच होळी आणि रंगपंचमीसाठी केवळ पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांचा वापर करावा. पाणी, रंग किंवा घाण भरलेले फुगे फेकणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले होते.

गगनगिरी सोसायटीचे लक्ष्मण रिठे,अरिहंत गार्डन सोसायटीचे वसंत सणस, उषानगर सोसायटीचे संतोष गायकवाड, श्रेयश ताम्हाणे, कृष्णा रेसिडेन्सीचे भूषण पाटील, तुषार हजारे, कमलाबेन सोसायटीतील अण्णा देशमुख, नरेश जाधव व रोहन साखरे यांनी विशेष सहकार्य केले. या प्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष संदीप गायकवाड उपस्थित होते. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शाखेचे विविध उपक्रम विभाग कार्यवाह दयानंद पोळ, शाखा कार्याध्यक्ष महेंद्र ओव्हाळ आणि शाखा प्रधानसचिव प्रतिभा मंडावळे यांनी विशेष योगदान दिले. तसेच, शाखेचे युवा सहभाग विभाग कार्यवाह क्षितीज साळवे, योगेश वालगुडे आणि अमोल पंडित यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

"होळी करा लहान, पोळी करा दान" या उपक्रमाच्या माध्यमातून खोपोलीतील नागरिकांनी सामाजिक जाणीवेचे भान ठेवत पर्यावरण स्नेही सण साजरा करण्याचा आदर्श घालून दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत