HEADLINE

Breaking News

शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये, स्वर्गीय वसंतराव ओसवाल यांना अभिप्रेत असलेले शैक्षणिक काम , सेवाभाव व सामाजिक बांधिलकीचा विचार व वारसा जोपासणारे कार्य आम्ही करू : गीता पालरेचा




पाली : शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांनी स्वर्गीय वसंतराव ओसवाल यांच्यावर त्या काळी अत्यंत विश्वासाने सु. ए. सो ची सोपवलेली जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे व कर्तव्ये तत्परतेने पार पाडली. ही शैक्षणिक संस्था नावारूपाला यावी यासाठी ओसवाल यांचे योगदान मोठे व अतुलनीय राहिले आहे. सद्यस्थितीत स्वर्गीय वसंतराव ओसवाल यांच्या नंतर संस्थेचे अध्यक्ष पद हे रिक्त झालेले आहे. यावेळी सु. ए.सो शैक्षणिक संस्थेचा कारभार ओसवाल व लिमये एकत्रितच पाहणार असल्याचे प्रतिपादन सौ. गीताताई पालरेचा यांनी केले. पाली येथील कार्यालयात शनिवारी दि.(15)मार्च रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालरेचा व संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. कै. शिक्षण महर्षी व आदिवासी सेवक दादासाहेब लिमये यांनी आदिवासी पाड्यांच्या नसानसांत शिक्षणाचे वारे पोहचवून, त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे असामान्य कार्य केले. १९४१ मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या सुधागड एज्युकेशन सोसायटीमार्फत त्यांनी रायगड जिल्हयाच्या शहरी आणि ग्रामीण भागात सुमारे ४० शिक्षण संस्था स्थापन केल्या, पुढील काळात सु.ए. सो संस्था टिकवणे जोपासणे व वाढविणे यासाठी स्वर्गीय वसंतराव ओसवाल यांनी आपल्या हयातीत तन मन धनाने झोकून देत महत्वपूर्ण योगदान दिले. सद्यस्थितीत सु.ए.सो च्या या रिक्त असलेल्या अध्यक्ष व सचिव पदाच्या निवडीसाठी दि.23 मार्च 2025 रोजी संचालक मंडळाची महत्वपूर्ण बैठक पालीत आयोजित केली असून या बैठकीत सर्वानुमते व लोकशाही पद्धतीने रिक्त पदाची निवड करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. त्यामुळे सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या नव्या अध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याचा फैसला 23 मार्च रोजी होणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये, स्वर्गीय वसंतराव ओसवाल यांना अभिप्रेत असलेले शैक्षणिक काम , सेवाभाव व सामाजिक बांधिलकीचा विचार व वारसा जोपासणारे कार्य आम्ही सर्व संचालक मंडळ एकमताने व एकदिलाने करू अशी शाश्वती सौ. गीता ताई पालरेचा यांनी दिली. 

या पत्रकार परिषदेत सु.ए. सो संचालक मंडळातील पदाधिकारी व वसंतराव ओसवाल यांच्या कन्या सौ. गीताताई पालरेचा , तसेच ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश कारखानीस, ग रा म्हात्रें सर, रमेश साळुंके, हर्षा चांदोरकर आदी उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत