धबधब्याच्या काठीच परश्यानं मांडली चूल; निसर्गाच्या सानिध्यात बनवली गरमागरम भजी
मुंबई, 29 जुलै : पहिल्याच चित्रपटातून मराठी मनोरंजन सृष्टीत हिट झालेला अभिनेता म्हणजे आकाश ठोसर. त्याने सैराट या चित्रपटात परश्या ही भूमिका साकारून महाराष्ट्राच्या घराघरात ओळख मिळवली. प्रेक्षकांनी त्याला आपल्या मनात विशेष स्थान दिलं. सैराट नंतर आकाशने अनेक भूमिका साकारल्या असल्या तरी आजही त्याला अनेकजण परश्या म्हणूनच ओळखतात. आकाश सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. त्याची सोशल मीडियावर तुफान फॅन फॉलोईंग आहे. अशातच आता आकाशने पोस्ट केलेला एक व्हिडीओ चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरलाय.
मराठमोळ्या आकाश ठोसरला भटकंतीची खूप आवड आहे. तो अनेकदा त्याच्या कामातून वेळ काढून भटकंती करताना दिसतो. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर देखील शेअर करतो. सध्या आकाश सह्याद्रीची भटकंती करतो आहे. काही दिवसांपूर्वी त्याने सह्याद्रीतील धबधब्याचा व्हिडीओ चर्चेत आला होता. आकाशने सह्याद्रीच्या धबधब्यात Waterfall Rappelling हा खतरनाक स्टंट केला. चाहत्यांनी त्याचा हा व्हिडिओ पाहून कौतुक केलं होतं. आकाशने आता याच सहलीतील पुढचा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडिओत आकाश कुठलीही स्टंटबाजी करत नसून त्याने निर्सर्गाच्या सानिध्यात चक्क चूल मांडली आहे. आकाश या व्हिडिओमध्ये सगळ्यांसाठी चक्क गरमागरम भजी बनवताना दिसतो आहे. आकाशने हा व्हिडीओ पोस्ट करत 'सुख...' असं म्हटलं आहे. या व्हिडिओत आकाशने धबधब्याच्या काठीच एक छोटी शेगडी पेटवली, त्यावर पातेलं ठेवून तेल गरम केलं आणि चक्क त्यात बटाटा भजी तळली आणि सगळ्यांना खाऊ घातली. आकाशच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत