HEADLINE

Breaking News

अनेक पिढ्यांपासून स्मशानभूमी नसल्यामुळे पौध, माजगांव आदिवासी बांधव मतदानांवर घालणार बहिष्कार

----------------------------------------------------------------------------------------------------------------------
| खालापूर | | वार्ताहर |

देश महासत्तेकडे वाटचाल करतोय, ठिकठिकाणी स्मार्ट सिटी उभ्या राहात आहेत. शहरात यंत्राच्या एका बटनावर प्रेताला अग्नी दिली जातो. मात्र आदिवासी वाड्यांना स्मशानभूमीच नसावी हे विषमवादी चित्र रायगड जिल्ह्यातील ग्रुप ग्रामपंचायत माजगाव हद्दीत असलेल्या पौध आणि माजगांव अशा दोन आदिवासीवाड्यांमध्ये दिसून येते. ग्रामस्थांना स्मशानभूमी नसल्यामुळे पाताळगंगेच्या किनाऱ्यावरच अंतिम संस्कार करण्याची वेळ आली आहे.
गेले अनेक वर्षे या आदिवासी बांधवांना स्मशानभूमी नाही. निवडणुकांमध्ये मतं द्यायची आणि आश्वासने घ्यायची, हेच येथील ग्रामस्थ अनुभवत आले आहेत. पावसाळ्यात अंतिम संस्कार करताना ग्रामस्थांना त्रास होतो. पाताळगंगेच्या किनाऱ्यावर एका दगडावर लाकडे रचून विधी केले जातात. विशेष म्हणजे स्मशानभूमी नाहीच पण येथे निवारा शेड नाही. स्मशानभूमी बांधून द्या, अशी मागणी ग्रामस्थ सातत्याने करतात. मात्र, त्यांची आश्वासनावरच बोळवण केली जाते. माजगांव ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत असताना, ग्रामस्थ मतदानांवर बहिष्कार घालणार असल्याचे बोलले जाते. प्रत्येक गावाला स्मशानभूमी आहे. मग आमच्यावर अन्याय का, असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. गेल्या अनेक पिढ्या उघड्यावर अंतिम संस्कार करण्यात येतात, मात्र त्यांचे कुणालाही सोयरसुतक नाही. लोकप्रतिनिधींना जाग येऊन वाडीला स्मशानभूमी देतील का, अशी आर्त विनवणी करण्यात येत आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------

गेल्या अनेक पिढ्यांपासून स्मशानभूमी नाही. शिवाय, आमच्या वाडीपासून दोन कि.मी अंतर चालत जाऊन पौध येशील पाताळगंगेच्या किनाऱ्यावर अंतिम संस्कार करावे लागतात. या ठिकाणी उभे राहण्यासाठी जागा नाही. लोकप्रतिनिधी फक्त आश्वासनेच देत आहेत.
~
देव वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
पौध आणि माजगांव आदिवासी समाजासाठी स्मशानभूमी असावी याबाबत आमचे प्रयत्न सुरु आहेत. आमदार निधीतून स्मशानभूमी बांधावी, असा प्रस्ताव पाच ते सहा महिन्यांपूर्वी पाठविला आहे. निवडणुका पार पडल्यानंतर तातडीने त्यांचा प्रश्न मार्गी लावला जाईल.
~
संदिप धारणे, ग्रुप ग्रामपंचायत, माजगांव ग्रामसेवक
----------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत