सुधागड तालुक्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे वंचित बहुजन आघाडी आक्रमक वीज वितरण उपअभियंत्यांना निवेदन देऊन विचारला जाब मेणबत्ती व दिवा भेट कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा
पाली, ता. 8 (वार्ताहर) ऐन पावसाळ्यात सुधागड तालुक्यात विजेचा लपंडाव सुरु आहे. या खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे सर्वसामान्य जनता व व्यावसायिक हैराण झाले आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आक्रमक होऊन सोमवारी (ता.8) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाली वीज वितरण उपअभियंत्यांना निवेदन देऊन जाब विचारला. तसेच मेणबत्ती व दिवा भेट देऊन अनोखे आंदोलन केले. काही काळात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देखील दिला.
या निवेदनात नमूद केले आहे की सुधागड तालुका हा मागास व ग्रामीण तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील सामान्य जनता, विद्यार्थी, कामगार लघुउद्योग, शाळा आदी आस्थापने या विजेवर चालणाऱ्या उपक्रमांवर अवलंबून आहेत. तालुक्यातील ग्राहक नियमितपणे वीज बिल भरत असतात, आणि ते न भरल्यास तातडीने ते आपल्याकडून खंडित केले जाते. वारंवार वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने येथील जनता त्रस्त आहे. पावसाळ्यात विज जाऊ नये म्हणून उन्हाळ्यात आठवड्यातून किमान पाच-सात लोड शेडिंग घेत असता. मात्र त्याचा काही उपयोग होत नाही. आज सुद्धा पावसाळ्यात वारंवार अनेक कारणे सांगून वीज खंडित करण्यात येते. तसेच विजेचा युनिट दर वाढल्यामुळे त्याचा त्रास सुद्धा होताना दिसत आहे. यामुळे महावितरणचा ढीसाळ कारभार समोर येत आहे. येणाऱ्या पुढील काळात विद्युत पुरवठा खंडित करण्यात येऊ नये, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल. सध्या आपल्या कार्यालयात सुद्धा वीज पुरवठा खंडित होत असतो. त्याकरिता आपणास मेणबत्ती व दिवा सप्रेम भेट देत आहोत. असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हाध्यक्ष अमित गायकवाड, तालुका अध्यक्ष राहुल गायकवाड, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत जगताप, नारायण जाधव, भागवत गायकवाड, प्रशांत गायकवाड, नितेश पवार, बाळाराम गायकवाड व आनंद जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत