HEADLINE

Breaking News

जयंत पाटील पराभूत का झाले?


जयंत पाटील यांचा पराभव झाल्यानं वाईट तर वाटणारच.. माझे त्यांच्याशी अनेक वर्षांचे चांगले संबंध आहेत.. 
मुद्दा तो नाही.
मुद्दा त्यांचा पराभव का झाला हा आहे..
अगोदर थोडा इतिहास सांगतो.. 
2002 पासून जयंत पाटील विधानपरिषदेचे सलग सदस्य आहेत.. 2002 मध्ये शेकापचे विधानसभेत किमान पाच सदस्य होते. नंतर ही संख्या घटत गेली.. तीन, दोन.. अन आज विधानसभेत शेकापचा एकही सदस्य नाही.
इथपर्यंत ही घसरण झाली.. 
परंतू प्रत्येक वेळी राजकीय परिस्थिती अनुकूल होत गेली.. जयंत पाटील विजयी होत गेले.. 
यावेळची परिस्थिती वेगळी होती..
शिवाय 
आपलं हक्काचं एकही मत नाही हे वास्तव जयंत पाटील यांच्या लक्षात आलं नाही.. .. विधान परिषद निवडणुकीत एक एक मत मिळवणं कठीण असताना जयंत पाटील यांना थेट 23 मतं मिळवायची होती..
 हे सोपं होतं का?
परंतू मागच्या चार वेळेस जशी लॉटरी लागली तशी ती यावेळेसही लागेल असं जयंत पाटील यांना वाटलं.. त्यांचं हे "वाटणं" त्यांच्या अंगलट आलं..
यालाही त्यांचं बेभरवश्याचं राजकारण कारणीभूत आहे.. जयंत पाटील कोणाचेच नसतात आणि ते सगळ्यांनाच गृहित धरतात.. हा स्वभाव आहे त्यांचा.. मला आठवतंय, मी 2000 मध्ये त्यांना सल्ला दिला होता की, "तुमचा जिल्ह्यातील खरा प्रतिस्पर्धी सुनील तटकरे आहेत.. त्यांच्यापासून सावध राहा".. दुर्दैवानं असं झालं नाही..पत्रकारांना राजकारणातलं काय कळतं? असं म्हणत त्यांनी माझ्या सल्ल्यांकडं कायम दुर्लक्ष केलं.. जयंत पाटील हे तटकरेंच्या बाबतीत नेहमी गाफील राहिले असं माझं निरीक्षण आहे.. सुनील तटकरे अडचणीत असले की, त्यांनी जयंत पाटलांना गाठायचं, चार आश्वासनं द्यायची अन आपला कार्यभाग उरकून घ्यायचा हा तटकरेंचा कायमचा शिरस्ता राहिलेला आहे..  रायगडात प्रतिस्पर्धी वाढू द्यायचा नाही हे राजकीय सूत्र तटकरेंनी जाणीवपूर्वक जपलं.. अ. र. अंतुलेंचं बोट धरून ते राजकारणात आले, पण नंतर अंतुले यांच्यावरच पश्चातापाची वेळ आणली.. त्यानंतरही अशोक साबळे, माणिक जगताप, सुरेश लाड यांचं आणि इतर अनेकांचं राजकारण त्यांनी कमश:संपवलं.. ते आपलंही राजकारण संपवत आहेत हे जयंत पाटील यांच्या लक्षातच आलं नाही.. शेकापचा बालेकिल्ला असलेल्या रायगडात आज शेकापचा एकही आमदार नाही.. अलिबाग, पेण, पनवेलही रिकामे झाले.. यामध्ये सुनील तटकरे यांचा मोठा वाटा आहे..
एवढं होत असतानाही तटकरे यांच्या मधाळ शब्दांनी जयंत पाटील मोहात पडत गेले..
मला नक्की माहिती नाही,
पण जयंत पाटलांनी लोकसभेला मदत करावी त्याबदल्यात सुनील तटकरे जयंत पाटील यांना विधान परिषद मिळवून देतील असं डील झालं होतं. आपलं काम झालं की, तटकरे दिलेला शब्द सोयीस्कर विसरतात.. यावेळेसही हे घडलेलं दिसतंय.. .
खरं म्हणजे जयंत पाटील महाविकास आघाडीत आहेत.. त्यामुळे आघाडीचे लोकसभेसाठीचे उमेदवार असलेले अनंत गीते यांना निवडून आणण्याची नैतिक जबाबदारी जयंत पाटील यांचीच होती.. तसं झालं नाही.. अलिबागेत ही सुनील तटकरे यांना अधिकची मतं पडली.. अनंत गीते पराभूत झाले..
ही सल उध्दव ठाकरे कसे आणि का विसरतील..?
त्यांनी जर विधान परिषदेत जयंत पाटील यांचा गेम केला असं कोणाला वाटत असेल तर तो जयंत पाटील यांच्या धरसोडीच्या राजकारणाचा परिपाक आहे असं मला वाटतं..
प्रारंभी म्हटल्याप्रमाणे जयंत पाटील यांचं स्वत:चं एकही मत नव्हतं.. शरद पवार गटानं प्रामाणिकपणे जयंत पाटील यांना मतं दिली असली तरी शिवसेना किंवा कॉंग्रेसची मतं जयंत पाटील यांना मिळाली नाहीत.. मला असं वाटतं की, महाविकास आघाडीनं जयंत पाटील यांच्या ऐवजी कॉंग्रेसचा आणखी एक उमेदवार द्यायला हवा होता.. कारण त्यांच्याकडं एक उमेदवार जिंकल्यानंतर तब्बल 14 मतं शिल्लक होती.. ती 14 आणि राष्ट्रवादीची 12 मतं होत होती.. राहिलेली 3 मतं शिवसेनेला देता आली असती.. म्हणजे आघाडीचे तीनही उमेदवार निवडून येण्याची शक्यता होती.. कॉंग्रेसचा दुसरा उमेदवार असता तर कदाचीत काँग्रेसची मतं फुटलीही नसती.. रायगडमध्ये कायम काँग्रेसला विरोध करणारया शेकापला आम्ही का मत द्यावं? त्याऐवजी आम्ही आमचं मत विकून काही लाभ पदरात पाडून घेऊ शकतो असा युक्तीवाद फुटीर कॉग्रेस आमदार करू शकतात.. अगदी राष्ट्रवादीनं जरी स्वतःचाउमेदवार दिला असता तरी कदाचीत परिस्थिती वेगळी राहिली असती.. 
आणखी एक
मिलिंद नार्वेकर यांचा अर्ज आल्यानंतर जयंत पाटील धोक्यात आहेत हे शरद पवार यांच्याही लक्षात आले असेलच की, पण तेही स्तब्ध बसले.. याचा अर्थ हे जयंत पाटील यांना धडा शिकविण्यासाठी झालं असेल का? शक्यता तशीच वाटते..
विधान सभेला सामोरं जाताना जयंत पाटील यांना या सारयाचा विचार करावा लागेल.. अगदी अलिबाग विधानसभा ही सोपी नाही.. बाहेर आणि घरातही मोठी नाराजी आहे.. याकडं दुर्लक्ष करून चालणार नाही..

एस.एम.देशमुख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत