पाली नगरपंचायत पोटनिवडणुकीत अटीतटीचा सामना शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार 13 मतांनी जिंकल्या
पाली, ता. 12 (वार्ताहर) पाली नगरपंचायतीच्या प्रभाग दहाची नगरसेवक पदाची पोटनिवडणुक रविवारी (ता. 11) झाली. सोमवारी (ता.12) या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार जिगिशा ओमकार खोडागळे या 13 मतांनी जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे या पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) आमनेसामने होते. दोन्ही उमेदवारांमध्ये अटीतटीचा सामना झाला. भाजपच्या अयोध्या सुशील शिंदे यांचा अवघ्या 13 मतांनी पराभव झाला.
एकूण 328 मतदान झाले. त्यामध्ये शिवसेनेच्या (शिंदे गट) जिगिशा ओंकार खोडागळे यांना 169 मते मिळाली तर, भाजपच्या अयोध्या सुशील शिंदे 156 मते मिळाली. आणि नोटा 3 पडले. निकालानंतर पाली तहसील कार्यालयाबाहेर व पालीत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत व फटाके फोडून जल्लोष केला. तसेच नवनिर्वाचित नगरसेविका यांनी नातेवाईक व पदाधिकाऱ्यांसह श्री. बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले.
या निवडणुकीत स्थलांतरित मतदारांनी महत्वाची भूमिका बजावली. नोकरी, व्यवसाय व कामानिमित्त इतर तालुक्यात व जिल्ह्यांमध्ये गेलेल्या नागरिकांनी यावेळी मतदानासाठी हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांची मते निर्णायक ठरली. तर काही स्थलांतर मतदार पोहचू शकले नाहीत, त्याचा फटका ही उमेदवारांना बसला.
भाजप व शिवसेना (शिंदे गट) हे मित्र पक्ष असणारे दोन्ही पक्ष एकमेकांच्या समोर निवडणूकीच्या मैदानात उभे राहिले होते. केंद्र व राज्यात एकत्रित सत्तेत असतानाही भाजप व शिवसेना (शिंदे गट) मात्र नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकमेकांविरोधात लढले. भाजप व शिवसेनेमध्येच ही दुरंगी लढत झाली. शिवाय शेकापक्षाच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील शिवसेना शिंदे गटाला छुपे सहकार्य केले गेल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शेकापचे निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज आहेत.
मात्र असे असले तरी पक्षापेक्षा स्थानिक पातळीवर वेगळी गणिते पाहायला मिळतात असे बोलले जात आहे.
फोटो ओळ, पाली, पाली बल्लाळेश्वर मंदिराबाहेर नवनिर्वाचित नगरसेविका व शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते. (छायाचित्र, अमित गवळे)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत