नदीच्या प्रवाहात अडकलेल्या दोन महिलांना जीव धोक्यात घालून वाचविले जांभूळपाडा करचुंडे येथील घटना चार धाडसी मासेमारांचा सत्कार
अमित गवळे
पाली, ता. 19 (वार्ताहर) सुधागड तालुक्यातील करचुंडे गावातील दोन महिला रविवारी (ता.18) सायंकाळी सहाच्या दरम्यान येथील अंबा नदीच्या पाण्याच्या जोरादर प्रवाहात मधोमध अडकल्या होत्या. येथे मासेमारी करत असलेल्या चार मासेमाऱ्यांनी या महिलांना पाहिले आणि जीवाची बाजी लावून त्यांना नदीतून बाहेर काढले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की लता शरद पानसरे व श्वेता शेखर पानसरे या दोन महिला परळी येथील आपली दुकाने बंद करून मधल्या रस्त्याने अंबा नदीच्या पात्रातून करचुंडे येथे घरी निघाल्या होत्या. त्यांच्या सोबत मयुरी महेश वझरेकर व सार्थक शेखर पानसरे हे देखील होते.
येथील अंबा नदीचे पाणी कमी असल्याने हे चारही जण नदीतून पलीकडे जाण्यासाठी निघाले, मात्र अचानक नदीचे पाणी वाढले. पाण्याचा प्रवाह वाढताना पाहून मयुरी वझरेकर व सार्थक पानसरे हे दोघे पाठीमागे फिरून धावत नदीकिनारी पोहोचले. मात्र लता व श्वेता पानसरे दोघींना पाठीमागे फिरून धावत परतता आले नाही. परिणामी या दोन्ही महिला मध्येच अडकून पडल्या. पाण्याच्या जोरदार प्रवाहात या महिला एकमेकींना धरून उभ्या होत्या. अशा वेळी येथे मासेमारी करत असलेले प्रमोद म्हस्कर, शिवा म्हस्कर, तुकाराम म्हस्क व रवींद्र म्हस्कर यांनी क्षणाचाही विलंब न करता ताबडतोब या महिलांना वाचवण्याचा निर्णय घेतला
आणि टायर ट्यूब मध्ये बसून दोर लावून या दोन महिलांना या चार मासेमाऱ्यांनी जीवाची बाजी लावून सुखरूप नदीकिनारी आणले. नदीकिनारी असलेल्या लोकांनी दोर खेचून मदत केली. यावेळी हा थरारक प्रसंग पाहण्यासाठी आजूबाजूला शेकडो लोकांनी मोठी गर्दी केली होती. या मासेमारांचा परळी ग्रामस्थांनी रात्री भव्य सत्कार केला.
नदीतून त्या महिला वाहून गेल्या असत्या परंतु मासेमारी करणारे आमचे मित्र प्रमोद म्हस्कर वत्यांच्या कुटुंबीयांनी धाडस करून महिलांना वाचवल्याने मोठी दुर्घटना टळली. नदीला पाणी अचानक वाढले, वरील असलेल्या धरणातून नदीला जर पाणी सोडले असेल तर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. पाणी सोडणार असतील तर खालच्या गावांना सूचना द्यायला हव्या होत्या. तालुका प्रशासनाने नक्की पाणी कस आले याची माहिती घ्यावी.
सुनील साठे, अध्यक्ष, मनसे, सुधागड तालुका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत