करंबेळी ठाकूरवाडी व खडई वाडीमध्ये पशुसंवर्धन विभागाची भेट, जनावरांची तपासणी करून पशुपालकांना केले मार्गदर्शन
वावोशी/जतिन मोरे :-रायगड जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, सहाय्यक आयुक्त व तालुका लघु पशु सर्व चिकित्सालय खालापूर यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने करंबेळी ठाकूरवाडी व खडई वाडीमध्ये प्रत्यक्ष गोठ्यावर जनावरांची तपासणी करण्यात आली असून या ठिकाणी तपासणी दरम्यान कोणताही आजार तसेच लंपी सदृश्य जनावरे आढळून आली नाहीत.
त्याचप्रमाणे करंबेळी व खडई वाडीतील पशुपालकांना गोठयातील स्वच्छता, मच्छर, चिलटे यांचे नियंत्रणाकरिता धूरी तसेच गोचिड नियंत्रणाविषयी मार्गदर्शन केले. तसेच गावात नवीन जनावरे आणल्यास त्याचे लसीकरण करून घ्यावे. या पथकाद्वारे जवळच्या खडई गावातील संतोष घाटे यांचेकडील मृत खोंडाची पाहणी केली असता सदरील मृत खोंड सडलेल्या अवस्थेत हा उघड्यावर टाकलेला आढळला. जनावराचा मृतदेह जमिनीत पुरून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. ग्रामपंचायत मार्फत गावामध्ये फवारणी करण्यात आली असून करंबेळी ठाकूरवाडी व खडई गावातील पशुपालकांनी यापूर्वी जनावरांना लसीकरण झाले असल्याचे सांगितले.यावेळी या ठिकाणी पथकामध्ये खालापूर पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी डॉ. रोहिणी गायकवाड, मुकेश मर्चंडे, पशुधन पर्यवेक्षक राजेंद्र गायकवाड, अश्विनी बोंदार्डे सहभागी झाले होते.
"करंबेळी ठाकूरवाडी व खडई वाडी या ठिकाणी तपासणी दरम्यान कोणताही आजार तसेच लंपी सदृश्य जनावरे आढळून आली नसून येथील पशुपालकांना बाह्य कृमी व आंतर कृमी निवारणासाठी लागणारी प्रतिबंधात्मक औषधे वाटप करून पशुपालकांना विविध जनावरांच्या रोगांबाबत करावयाच्या उपाययोजनाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पशुपालकांनी घाबरून न जाता तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास संपर्क साधावा."
डॉ. रोहिणी गायकवाड - पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती खालापूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत