दगडाला जिवंत आकार देणारा शिल्पकार हरपला, वावोशीचे हभप पांडूरंग काशिनाथ हातनोलकर अनंतात विलीन
दगडाला जिवंत आकार देणारा शिल्पकार हरपला, वावोशीचे हभप पांडूरंग काशिनाथ हातनोलकर अनंतात विलीन
वावोशी/जतिन मोरे :- वावोशी गावातील संत विचारांचे पाईक असलेले व्यक्तीमत्व हभप पांडूरंग काशिनाथ हातनोलकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले ते ९० वर्षाचे होते. हभप पांडूरंग काशिनाथ हातनोलकर हे 'कानू बुवा' या नावाने सर्वत्र प्रसिद्ध होते. संत तुकाराम महाराजांचे अभंग त्यांचे तोंडपाठ होते. त्यांच्याशी कोणत्याही विषयावर चर्चा करताना ते संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील चरणाचा दाखला देऊन ते त्या विषयाचे स्पष्टीकरण देत असत. त्याचप्रमाणे त्यांना शिल्पकला देखील अवगत होती. दगडाला आकार देऊन त्यामध्ये जिवंतपणा आणण्याची लाजवाब कला त्यांच्यात होती. त्यांनी वावोशी गावातील शंकर मंदिरातील पिंड व नंदी बैलाचे शिल्प साकारले आहे. रानसई येथील देवीच्या मंदिराबाहेरील पहारेकरी असणाऱ्या शिपायांच्या शिल्पकृती देखील हुबेहूब साकारली आहे. तसेच होराळे येथील विठ्ठल रखुमाई मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापनेमध्ये देखील त्यांचे मोलाचे योगदान आहे. अत्यंत नम्र, शांत व संयमी स्वभावाचे असणारे कानु बुवा हे एक उत्तम कीर्तनकार, वास्तुविशारद व शिल्पकार देखील होते. त्यामुळे असे बहुआयामी व्यक्तीमत्व निघून गेल्याने वावोशी परिसरात शोक व्यक्त केला जात असून त्यांचे समाजाप्रती असलेले योगदान, आदर्श विचार व कार्य हे पुढच्या पिढीला नेहमीच प्रेरणादायी ठरणारे आहेत. त्यांच्यापाठी एक भाऊ, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार असून त्यांचा दशक्रिया विधी चा कार्यक्रम मंगळवार दि.०१/१०/२०२४ रोजी श्री क्षेत्र धाकटी पंढरी साजगाव या ठिकाणी होणारा असून त्यांचे उत्तरकार्य ०४/१०/२०२४ रोजी त्यांच्या राहत्या घरी वावोशी या ठिकाणी होणार आहे व या दिवशी प्रवचनकार हभप श्री काशिनाथ वाघुले महाराज यांचे सकाळी १०:३० वा. प्रवचन होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत