HEADLINE

Breaking News

नवरात्रीत 'शोध जिजाऊ - सावित्री लेकीचा' उपक्रम; सत्यशोधक वारकरी महासंघाचा पुढाकार

सत्यशोधक वारकरी महासंघाच्या वतीने ‘शोध जिजाऊ - सावित्री लेकीचा’  उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

वावोशी/जतिन मोरे :-  रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने 'सत्यशोधक वारकरी महासंघाच्या वतीने ‘शोध जिजाऊ - सावित्री लेकीचा’ हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. महिलांना जिजाऊ माँ साहेब आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांशी जोडणे आणि त्यांच्यातील नेतृत्वगुणांना चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

    या उत्सवात 'गरबा नृत्य' झाल्यानंतर महिलांसाठी एक विशेष प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती. या प्रश्नमंजुषेत सावित्रीमाई फुले व जिजाऊ माँ साहेब यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रश्न विचारण्यात आले. प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण दिला गेला व त्यातून सहभागी महिलांपैकी प्रथम, द्वितीय, आणि तृतीय क्रमांकाची विजेती निवडण्यात आली. विजेत्या महिलांचा पैठणी, साडी आणि इतर उपहार देऊन सत्कार करण्यात आला. महिलांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी एक विशेष प्रश्न विचारण्यात आला: "तुम्ही मुख्यमंत्री झालात तर काय कराल?" यावर महिला प्रचंड उत्साहाने आणि आत्मविश्वासाने उत्तरे देत होत्या. काही महिलांनी माईक पहिल्यांदा हातात घेतला होता, तरी त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. यावेळी या उपक्रमात विजेत्या महिलांचे कौतुक देखील करण्यात आले.  या उपक्रमात प्रथम क्रमांक मिळालेल्या नीलम गोळे यांना पैठणी साडी, द्वितीय क्रमांक निखिता भगत यांना साडी व तृतीय क्रमांक किशोरी पोंगडे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शिवाय सर्व सहभागी महिलांना उत्तेजनार्थ भेटवस्तू देण्यात आल्या.

    कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सत्यशोधक वारकरी महासंघ आणि विनायक अपर्मेट मधील सर्व सभासदांनी मोलाचे योगदान दिले. श्री. कृष्णा ठाकूर, निखिल भगत या उपक्रमात निशा येलवे, रूक्मिणी सावंत, माला सिंग, निशा हुले, अनिता गिरी, शिला चव्हाण, अनिता ठाकूर, श्रीकृष्ण ठाकूर, चंद्रकांत येलवे, विश्वास कदम, लक्ष्मण चव्हाण, नितेश भगत, अविनाश झोरे, माधव सानप  आदी सदस्यांचे सहकार्य लाभले. अशा उपक्रमांच्या माध्यमातून महिलांना प्रबोधनात्मक आणि प्रेरणादायी संदेश दिला जात आहे, ज्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडविण्याची प्रक्रिया अधिक सशक्त होत आहे.  

"उपक्रमाचा मुख्य हेतू महिलांना सावित्रीबाई फुले आणि जिजाऊ माँ साहेब यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणे आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा घेण्यास प्रवृत्त करणे हा होता. महिलांच्या जीवनात शिक्षण, आत्मनिर्भरता आणि सामाजिक परिवर्तनाची भूमिका किती महत्त्वाची आहे, याची जाणीव या उपक्रमातून करून देण्यात आली."


-महेश पोंगडे महाराज - 'सत्यशोधक वारकरी महासंघ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत