७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त खोपोलीत संविधान जागृतीसाठी महा.अंनिसच्या वतीने पथनाट्य सादरीकरण
खोपोली : ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (महा.अंनिस) खोपोली शाखेच्या वतीने 'संविधान बांधीलकी महोत्सव' अंतर्गत २६ जानेवारी २०२५ रोजी खोपोली शहरात विविध ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्यांमधून संविधानाचे महत्त्व, स्त्री-पुरुष समानता, शिक्षणाचा अधिकार आणि राष्ट्रीय एकात्मता यांसारख्या विषयांवर प्रबोधन करण्यात आले.
पथनाट्य सादरीकरणासाठी खोपोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, खोपोली रेल्वे स्टेशन आणि खोपोली बस स्थानक अशी ठिकाणे निवडण्यात आली होती. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या पथनाट्यांना प्रतिसाद दिला. या पथनाट्यांद्वारे संविधानातील मूलभूत अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव करून देण्यात आली तसेच समाजातील समानतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने शिक्षणाचा अधिकार, स्त्री-पुरुष समानता, धार्मिक सहिष्णुता आणि शोषणमुक्त समाजाची निर्मिती यावर भर देण्यात आला.
पथनाट्य सादरीकरणासाठी संदीप गायकवाड (रायगड जिल्हा कार्याध्यक्ष), रोहन दळवी (रायगड जिल्हा युवा सहभाग विभाग कार्यवाह), महेंद्र ओव्हाळ (शाखा कार्याध्यक्ष), सौ. प्रतिभा मंडावळे (शाखा प्रधान सचिव), आणि स्पर्श गायकवाड (शाखा सदस्य) यांनी विशेष योगदान दिले. या कार्यक्रमाला डॉ. सुभाष कटकदौंड (शाखा अध्यक्ष), दयानंद पोळ (विविध उपक्रम विभाग कार्यवाह), ज्योती भुजबळ (जाती अंत संकल्प विभाग कार्यवाह), तसेच हितचिंतक सभासद उस्मान शेख, हैदर अली यांनी आवर्जून हजेरी लावली.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांनी पथनाट्याचे कौतुक केले आणि संविधानाशी संबंधित अशा उपक्रमांची गरज अधिकाधिक ठिकाणी असल्याचे नमूद केले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे हे पथनाट्य खोपोलीकरांसाठी प्रेरणादायी ठरले. या उपक्रमामुळे समाजातील संवैधानिक मूल्यांबद्दल जनजागृती होण्यास मोठी मदत झाली.
%20(1).jpeg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत