HEADLINE

Breaking News

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या "जागर स्त्री शक्तीचा, प्रवास मानसिकता बदलाचा" अभियान व परिवर्तन नाट्य कला अकादमीच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पारलिंगी व्यक्तींशी खुला संवाद


|वार्ताहर| |खालापूर|

खोपोली: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जागर स्त्री शक्तीचा प्रवास मानसिकता बदलाचा हे अभियान १६ ऑक्टोंबर पासून चालू झाले होते. या अभियाना अंतर्गत महा. अंनिसने विविध विषयांवर स्त्रियांसाठी उपक्रम राबवले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून परिवर्तन संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त संयुक्त विद्यमाने समाजात वंचित असलेल्या पारलिंगी व्यक्तींची मुलाखत घेण्यात आली.   विजयादशमीच्या दिवशी परिवर्तन नाट्य कला अकादमीचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे खोपोली पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश काळसेकर, ताराराणी ब्रिगेड च्या रायगड जिल्हाध्यक्षा वर्षा मोरे, महा. अंनिस माजी रायगड जिल्हाध्यक्ष यशवंत गायकवाड, सी. के. मिसळ कॅफे चे कुलदीप चव्हाण, महा. अंनिस शाखा अध्यक्ष डॉ. सुभाष कटकदौंड  यांच्या हस्ते पाण्याच्या दिवा पेटवून दीप प्रज्वलन करण्यात आले आणि नटराजाचे पूजन करण्यात आले.  मान्यवरांचे स्वागत पुस्तके व तुळशीचे रोप देऊन करण्यात आले. केतन गवली या कलाकाराने पारलिंगी व्यक्तीच्या आयुष्यावरील "चिराग" हि छोटी नाटिका सादर करत उपस्थितांना सुन्न केले. सुल्तान नदाफ याने "माही रे" या गीतावर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. परिवर्तन नाट्य कला अकादमी मध्ये नव्याने कला क्षेत्रात पदार्पण करणारे नवख्या तरुणांना मोफत नाट्य प्रशिक्षण दिले जाते. खालापूर तालुक्यातील ३० पेक्षा अधिक कलाकार या कला अकादमी मध्ये प्रशिक्षण घेत आहेत. 

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या खोपोली - खालापूर शाखेच्या वतीने महिला सहभाग विभाग आयोजित "जागर स्त्री शक्तीचा प्रवास मानसिकता बदलाचा" या अभियानांतर्गत पारलिंगी व्यक्तींसोबत मुलाखत व खुला संवाद या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता. समाजातील लिंगभेद कमी व्हावा, समाजात समता प्रस्थापित व्हावी यासाठी या मुलाखतीचे प्रयोजन होते. या मुलाखतीत चौक येथील संजना वाघमारे आणि कोमल तसेच खोपोली येथील काजल मोरे सहभागी झाल्या होत्या. महा अंनिस रायगड जिल्हा कार्याध्यक्ष संदीप गायकवाड आणि महा अंनिस खोपोली शाखा कार्याध्यक्ष महेंद्र ओव्हाळ यांनी संजना वाघमारे आणि कोमल मोरे यांच्या आयुष्यातील संघर्षमय प्रवास उलगडून उपस्थितांसमोर ठेवला. उपस्थित असलेल्या सुविधा गायकवाड, ज्योती भुजबळ, मंगेश निकळजे, सुनील जगताप, प्रमोद गायकवाड, रोहन दळवी व नाट्य कलाकारांनी त्यांना पडलेले विविध प्रश्न यावेळी विचारण्यात आले. मुलाखती नंतर कोमल या पारलिंगी व्यक्ती ने केलेल्या नृत्याने सर्वांची मने जिंकून घेतली. यावेळी खोपोली पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश काळसेकर यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, खोपोली शाखेला आणि परिवर्तन नाट्य कला अकादमीच्या पुढील कार्यास सदिच्छा व्यक्त केल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी हृतिक विरले, मनाली इंगळे, दर्शन कर्णुक, जितेंद्र माने या कलाकारांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी पारलिंगी व्यक्तींच्या हातून केक कापून वर्धापन दिनाचा आनंद व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सी. के. मिसळ कॅफे चे कुलदीप चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत