उल्हास नदीवर गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या गणेशभक्ताचा मृतदेह आठव्या दिवशी सापडला.
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील चांदई येथील उल्हास नदीवर गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या उकरूल येथील गणेशभक्ताचा मृतदेह गुरुवारी आठव्या दिवशी धामोते येथील धनेश्वरी मंदिराच्या मागे सापडला.
उकरूल येथील मॅपल सोसायटीमध्ये राहणारे चेतन सोनवणे यांचा आणि त्यांच्यासोबत असलेले तिघे दि.28 सप्टेंबर रोजी उल्हास नदी येथे गणेश विसर्जन करण्यासाठी गेले असता वाहून गेले होते. त्यातील एक रोहित रंजन हा स्वतः पोहून बाहेर आला होता, तर त्यावेळी चेतन सोनवणे तसेच त्यांचे मित्र जगदीश साहू आणि यश जगदीश साहू हे तिघे उल्हास नदीत वाहून गेले होते. स्थानिक आदिवासी तरुण शंकर कातकरी याने यश साहू यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढला होता. तर अन्य चेतन सोनवणे आणि जगदीश साहू यांची नोंद कर्जत पोलीस ठाणे येथे हरवले असल्याबद्दल करण्यात आली होती. त्यांनतर सलग तीन दिवस अपघातग्रस्त मदतीसाठी आणि कोलाड रेस्क्यू टीमकडून पाणबुड्या आणि बोटींच्या सहायाने हा शोध घेण्यात आला होता.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी जगदीश साहू यांचा मृतदेह घटनस्थळी आढळून आला. मात्र, चेतन सोनवणे यांचा मृतदेह आढळून आला नव्हता. त्यामुळे तिसऱ्या दिवशी कर्जत पोलीस आणि प्रशासनाने शोध मोहीम थांबवली होती. कोल्हारे, सामोरे नळपाणी योजनेचे काम सुरू असून, त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना त्या मृतदेहाबद्दल माहिती मिळाली आणि त्यानंतर नेरळ पोलिसांना कळविण्यात आले. नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत शिंदे, उपनिरीक्षक दहातोंडे, किसवे, सरगर आणि पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने खोपोली येथील गुरुनाथ साठलेकर आणि सहकाऱ्यांनी चेतन सोनवणे याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. त्या मृतदेहाचे शवविच्छेदन नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी उल्हास नदीवर केले आणि त्यानंतर चेतन सोनवणे याचा मृतदेह सोनवणे कुटुंबियांच्या ताब्यात दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत