ताडगाव आदिवासीवाडीतील ग्रामस्थांना एकाच ठिकाणी मिळणार विविध लाभ बहुउद्देशीय सभागृहास मंजुरी
पाली, ता. 16 (अमित गवळे) सुधागड तालुक्यातील ताडगाव आदिवासीवाडी येथे बहुउद्देशीय सभागृह उभारणीसाठी मंजुरी मिळाली आहे. हे बहुउद्देशीय सभागृह झाल्यानंतर येथील आदिवासी बांधवांना विविध बाबींचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहे.
प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (पी.एम.जनमन) अंतर्गत अलिबाग येथे सोमवारी (ता.15) झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार रविंद्र पाटील यांच्या हस्ते या बहुउद्देशीय सभागृहाचे मंजुरी पत्र येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन भिमचंद्र साठे, ग्रामसेवक मयूर कारखानीस व उपसरपंच संजय चौधरी यांनी स्वीकारले.
या बहुउद्देशीय सभागृहामध्ये एक सभागृह, एएनएम केंद्र, अंगणवाडी, वर्ग खोली आणि कार्यालय असणार आहे. हे बहुउद्देशीय सभागृह मंजूर करून आणण्यासाठी ग्रामसेवक मयूर कारखानीस, केतन साठे, सरपंच करुणा भिमचंद्र साठे, उपसरपंच संजय चौधरी आणि सर्व सदस्य यांनी पुढाकार घेऊन पाठपुरावा केला.
बहुउद्देशीय केंद्र उभारल्यानंतर आमच्या आदिवासी बांधवांना एकाच ठिकाणी विविध लाभ मिळणार आहेत. त्यामुळे आम्ही भारत सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच ही योजना आमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो.
सचिन साठे, सामाजिक कार्यकर्ते, ताडगाव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत