निराधार महिलेला आसरा मिळण्यासाठी जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे मुख्याधिकाऱ्यांना साकडे आमरण उपोषणाचा इशारा
पाली, ता. 14 (वार्ताहर) जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी खालापूर येथील एका निराधार महिलेला गावठाण मध्ये जागा मिळावी यासाठी खालापूर मुख्याधिकारी यांना बुधवारी (ता.14) निवेदन दिले. मागणी पूर्ण न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देखील दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की खालापूर नगरपंचायत हद्दीत राहणाऱ्या जयश्री विजय लोंढे निराधार असून बेघर आहेत. सदर महिलेच्या पतीचे 2021 मध्ये कोरोना काळात निधन झाले आहे. या महिला येथील कायमस्वरूपी रहिवासी आहेत. मात्र त्यांना राहण्याकरिता कुठलीही व्यवस्था नाही त्या मिळेल त्या ठिकाणी आसरा शोधत असतात. त्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. याआधी वारंवार या महिलेने नगरपंचायत कार्यालयाकडे राहण्यासाठी जागा मिळावी अशी मागणी केली आहे. मात्र या महिलेला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.
त्यामुळे नगरपंचायतने या महिलेस राहण्यासाठी गावठाण हद्दीत कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी अन्यथा महिलेस वंचीत बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आमरण उपोषण करतील असा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदन देतेवेळी वंचित जिल्हा युवक अध्यक्ष अमित गायकवाड, रायगड जिल्हा महासचिव वैभव केदारी, वंचित खालापूर तालुका महासचिव महेंद्र मंगेश ओव्हाळ, खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण भालेराव, तालुका युवक अध्यक्ष प्रशांत गायकवाड व रुपेश गायकवाड आदींसह वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या संदर्भात मुख्याधिकारी म्हणाल्या की या प्रकरणाबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
फोटो ओळ, पाली, खालापूर मुख्याधिकारी यांना निवेदन देतांना वंचित चे पदाधिकारी व सदर महिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत