पालीमध्ये समन्वय समितीची बैठक ! सुधागड तालुका समन्वय समितीच्या बैठकीत अंबा नदी प्रदूषण, अनधिकृत बांधकामे, जलजीवन मिशनच्या कामांकडे वेधले लक्ष.
पाली : सुधागड तालुका समन्वय समितीची बैठक सोमवारी (१५ जुलै) तहसील कार्यालयातील हिरकणी कक्षेत पार पडली. या बैठकीत अक्षरशः तक्रारींचा पाऊस पडला. अंबा नदी प्रदूषण, कंपन्यांमधील अनधिकृत बांधकामे, जलजीवनश मिशन योजनांची कामे अशा अनेक महत्वाच्या विषयांकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले.
सुधागड तालुक्यातील रासळ ग्रामपंचायत हद्दीतील काही केमिकल कंपन्यामधील रसायनयुक्त सांडपाणी कंपनीच्या मागील बाजूस असणाऱ्या अंबा नदीत सोडले जाते. तसेच येथील काही कंपन्यांमध्ये परवानगी न घेता अनधिकृत बांधकामे केली जात असल्याचा आरोप रासळ ग्रामपंचायतीचे माजी सदस्य नरेश खाडे यांनी समन्वय समितीच्या बैठकीत केला. यावर समन्वय समितीचे अध्यक्ष अनुपम कुलकर्णी यांनी सांगितले की, हा विषय अतिशय गंभीर असून तहसीलदार यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन संबंधित विभागाकडून कंपन्यांना नोटीस देण्यात याव्यात.
सुधागड तालुक्यात होत असणाऱ्या जल जीवन मिशनच्या कामाकडे समन्वय समितीचे सदस्य अरविंद फणसे यांनी लक्ष वेधले. काही ठिकाणच्या विहिरींना पाणीच लागलेले नाही, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याचा इन्कार केला. यावर अध्यक्षांनी सदर कामाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यात येईल, असे सांगितले. लाडकी बहीण योजनेचा तालुक्यातील महिलांना फायदा मिळवून देण्यासाठी कॅम्प घेऊन त्यांना दाखल्याची व्यवस्था करावी अशी मागणी यावेळी अध्यक्ष कुलकर्णी यांनी तहसीलदारांकडे केली. समन्वय समितीच्या बैठकीस काही शासकीय अधिकाऱ्यांनी दांडी मारली. बामुळे महिला सक्षमीकरण आणि सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार निर्मितीच्या विविध शासन योजना आणि उपक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात अधिकारी सपशेल अपयशी ठरले असल्याची खंत सुधागड तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष अनुपम कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळावी, सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न समस्यांचे निवारण व्हावे, याकरिता सामान्य जनता आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधून प्रशासनावर पकड ठेवून शासन योजनेची अंमलबजावणी व्हावी, यासाठी समन्वय समिती कार्यरत असल्याचे अनुपम कुलकर्णी यांनी यावेळी म्हटले. यावेळी अकार्यक्षम आणि कामचुकार शासकीय अधिकाऱ्यांना पारेवर घरत जनहिताच्या कामाला प्रथम प्राधान्य द्या, असे आवाहन सरकारी अधिकाऱ्यांना यावेळी करण्यात आले. या बैठकीला तहसीलदार उत्तम कुंभार, नायव तहसीलदार भारत फुलपगारे, नायब तहसीलदार ज्ञानेश्वर अडसुळे, समन्वय समितीचे सदस्य संजय म्हात्रे, संदीप दपके, अमोल कांबळे, अरविंद फणसे, गणेश शिंदे आदींसह सदस्य विविध शासकीय विभागाचे अधिकारी व पत्रकार उपस्थित होते. बँकांचे अधिकारी बैठकीला गैरहजर असल्याने सुधागड तालुक्यातील जनतेला बँकेशी निगडित कशा पद्धतीची सेवा मिळत असतील ? त्यांच्या तक्रारीचे काय? याबाबत नाराजी व्यक्त करीत विचारणा करण्यात आली.
गैरहजर राहिलेल्या अधिकाऱ्यांची तक्रार जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे करण्याबाबत समन्वय समिती अध्यक्ष अनुपम कुलकर्णी यांनी सुचविले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत