सुधागड तालुक्यात दहीहंडीचा उत्साह पारंपरिक पद्धतीने गोपाळकाला साजरा नेणवली शाळेत फुटली निपुण हंडी निपुण भाषा गणित व शिक्षण साहित्य विद्यार्थ्यांनी आनंदाने वेचले
अमित गवळे
पाली, ता. 27 (वार्ताहर) सुधागड तालुक्यात मंगळवार दिनांक 27 रोजी गोविंदाची दहीहंडीची धूम पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने गोपाळकाला साजरा करण्यात आला.
जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर सुधागड तालुक्यातील रजिप नेणवली शाळेत निपुण शिक्षण हंडी फोडण्यात आली. हंडी फोडल्यानंतर त्यातून निघालेले निपुण भाषा, गणित व शिक्षण साहित्य विद्यार्थ्यांनी आनंदाने वेचले. या कार्यक्रमातून मौजमजेबरोबर विद्यार्थ्यांना निपुण भारत अभियानाचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले. या निपुण हंडीत पाणी बचतीचा संदेश देखील मिळाला.
या कार्यक्रमाने विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या सर्वांचे मन प्रफुल्लित केले. विद्यार्थ्यांनी उत्साहात मनोरे रचून निपुण हंडी फोडली. यावेळी मुलींनीही मुलांसोबत मिळून धाडस दाखवत मनोरे रचले. मुलांच्या हाती विविध शैक्षणिक साहित्य मिळाले त्यात अक्षर, अंक, शब्द, रंग, चित्र मुलांनी वाचून ओळखुन दाखवले. तिसरी पर्यंतच्या मुलांना ही संधी मिळाली. या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये साक्षरता, संख्याज्ञान व निपुणतेची जाणीव निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी निपुणतेच्या ध्यास घेण्याची शपथ घेतली. यावेळी या अनोख्या कार्यक्रमाबद्दल पालकांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
कोट
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा निपुण भारत अभियानाचा भाग म्हणून हा उपक्रम घेण्यात आला. हे मनोरे रचून निपुण हंडी आयोजन गुणवत्ता विकासास पूरक ठरेल.
श्री. राजेंद्र अंबिके, मुख्याध्यापक, नेणवली
चौकट 1
सुधागड तालुक्यात दहीहंडीची धूम
पारंपरिक पद्धतीने गोपाळकाला साजरा
गोकुळाष्टमी हा पारंपरिक महत्वाचा व उत्साहाचा सण आहे. सर्व अबाल वृद्धांसह तरुणाईला गोकुळाष्टमीची ओढ लागलेली असते. मंगळवारी (ता.27) सुधागड तालुक्यात पाली, जांभूळपाडा, परळी, पेडली आदी सर्वच ठिकाणी दहीहंडीची धूम पाहायला मिळाली. पारंपरिक पद्धतीने तसेच पारंपारिक पेहराव व पारंपरिक वाद्यांच्या चालीवर गोपाळकाला उत्सव साजरा करण्यात आला.
आदिवासी वाड्या पाड्यावर देखील गोपाळकाल्याचा उत्साह पाहायला मिळाला. छोट्या मोठ्या दहीहंडी फोडण्याचा थरार देखील अविस्मरणीय होता. नृत्याचा ठेका धरत, गाणी म्हणत हे गोपाळ घरोघरी जात होते. तेथे दहिकाला, फळे आदी प्रसाद व अंगावर पाणी ओतून त्यांचे स्वागत झाले.
चौकट 2
पावसामुळे उत्साह द्विगुणित
विशेष म्हणजे यंदा गोपाळकल्याला पावसाने हजेरी लावल्याने दहीहंडीचा उत्साह द्विगुणित झाला. मुसळधार पावसात व ढगाळ वातावरणात दहीहंडी फोडण्याची मज्जा काही औरच असते. त्यामुळे बाळ गोपाळ व मोठ्यांना आनंद झालेला दिसत होता. दहीहंडी एकावर एक थर लावून फोडतांना वरून पावसाच्या सरी अंगावर आल्यातर सर्वांना सुखद गारवा मिळतो. शिवाय थकवा जाणवत नाही. शरीरातील पाण्याची पातळी घटत नाही. आणि त्यामुळे गोविंदा पथकांचा उत्साह अधिक वाढतो. परिणामी ते अनेक ठिकाणी जाऊन हंडी फोडण्याचा आनंद देखील घेतात. याशिवाय पाऊस असल्यामुळे हंडी जवळील माती भुसभुशीत होते. तिथे चिखल साठतो. त्यामुळे थर खाली कोसळले तरी कोणाला फारसी दुखापत होत नाही. हा फायदा देखील पावसाचा झाला.
फोटो ओळ, पाली, निपुण हंडी फोडतांना नेणवली शाळेतील विद्यार्थी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत