खोपोलीत अंधश्रद्धा निर्मूलन संवाद शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
खोपोली: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या खोपोली शाखेच्या वतीने रायगड जिल्हास्तरीय अंधश्रद्धा निर्मूलन संवाद शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला जिल्ह्यातील विविध भागांतून कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिराची सुरुवात सामाजिक सुधारणेच्या प्रेरणास्रोतांना वंदन करून तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष, शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून झाली. संविधानाच्या प्रास्ताविकेच्या अनावरणाने उद्घाटन करण्यात आले. यानंतर "आम्ही प्रकाश बीजे" या प्रेरणादायी गीताने शिबिराची औपचारिक सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रायगड जिल्हा प्रशिक्षण विभाग कार्यवाह मनोहर तांडेल यांनी केले. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याची गरज स्पष्ट केली. खोपोली शाखेचे अध्यक्ष डॉ. कटकदौंड यांनी शिबिरार्थींना शुभेच्छा दिल्या. माजी रायगड जिल्हाध्यक्ष यशवंत गायकवाड यांनी अध्यक्षीय भाषणात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यातील आव्हाने आणि संधी यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खोपोली शाखा कार्याध्यक्ष महेंद्र ओव्हाळ यांनी केले.
शिबिरात तीन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या सत्रात राज्य निमंत्रक सुशीला मुंडे यांनी "पंचसूत्री आणि अंनिसची भूमिका" या विषयावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात राज्य युवा सहभाग विभाग कार्यवाह प्रियंका खेडेकर यांनी "संघटनात्मक रचना आणि कार्यपद्धती" यावर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तिसऱ्या सत्रात रायगड जिल्हा प्रशिक्षण विभाग कार्यवाह मनोहर तांडेल यांनी "वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चमत्कार मागील विज्ञान" या विषयावर प्रयोगांसहित सखोल माहिती दिली. या चर्चासत्रांमध्ये फलज्योतिष, छद्म विज्ञान, मानसिक आरोग्य, भूत-भानामती आणि बुवाबाजी यासारख्या विषयांवर चर्चा झाली.
कार्यक्रमाच्या समारोपात अमोल पंडित आणि प्रथमेश जाधव यांनी शिबिराविषयी आपले अनुभव आणि प्रतिक्रिया व्यक्त केल्या. "हम होंगे कामयाब" या प्रेरणादायी गीताने शिबिराची सांगता झाली.
शिबिराला रायगडसह इतर जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जळगाव जिल्हा प्रधानसचिव प्रल्हाद बोऱ्हाडे, रायगड जिल्हा सांस्कृतिक विभाग कार्यवाह महेंद्र पाटेकर, निधी संकलन विभाग कार्यवाह रोहिदास गायकवाड, महिला सहभाग विभाग कार्यवाह सुविधा गायकवाड, खोपोली शाखा विविध उपक्रम विभाग कार्यवाह दयानंद पोळ, युवा सहभाग विभाग कार्यवाह क्षितिज साळवे, पनवेल शाखा महिला सहभाग विभाग कार्यवाह पूजा डांबरे आणि मोहोपाडा शाखा कार्याध्यक्ष रोहिदास कवळे हे प्रमुख उपस्थित होते.
या शिबिराच्या माध्यमातून उपस्थित कार्यकर्त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याची प्रेरणा मिळाली. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात अधिक प्रभावी सहभाग घेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत